ताकारी योजनेच्या यशाची अर्धी कहाणी!
By admin | Published: October 9, 2016 12:03 AM2016-10-09T00:03:01+5:302016-10-09T00:47:20+5:30
रविवार विशेष
महाकाय योजना
ताकारी उपसा जलसिंचन योजना महाकाय योजना आहे. ती चार टप्यात कृष्णा नदीतून पाणी उचलणारी आहे. पहिल्या टप्यात दोन हजार अश्वशक्तीचे सोळा पंप आहेत. दुसऱ्या टप्यावरही दोन हजार अश्वशक्तीचे सोळा पंप; तर तिसऱ्या टप्यावर १२५० अश्वशक्तीचे चार पंप आहेत. चौथ्या टप्यावर २५० प्रतिपंप अश्वशक्तीचे तीन पंप आहेत.
सांगली-औंध मार्ग फारच जुना आहे. या रस्त्यावरील वांगी हे एक आता पुढारलेले गाव आहे. या गावाला सांगलीकडून बांबवडेमार्गे येणारा रस्ता आहे. चिंचणीमार्गे इस्लामपूरकडून एक रस्ता येतो. कडेपूरकडून औंधचा रस्ता आहे. चौथा रस्ता विट्याहून शेळकबाव, ढवळेश्वरमार्गे येतो. याच वांगी गावच्या चौकात १९८५ मध्ये मी उभा होतो. विधानसभेची निवडणूक चालू होती. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि बलवडीचे सुपुत्र संपतराव पवार यांच्या प्रचारात विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. या चौकात डाव्या पक्षांचा आवडत्या पथनाट्याचा प्रयोग करायचा होता. माणसं काही गोळा झालेली नव्हती. एवढ्यात दोन-चार मोटारगाड्या आल्या. एका गाडीतून शिक्षकासारखी व्यक्ती खाली उतरली आणि एकाने सांगितले की, हेच ते पतंगराव कदम!
डॉ. पतंगराव कदम यांना मी प्रथम वांगीच्या शाळेच्या समोरील चौकात पाहत होतो. त्यांच्या विरोधातल्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याने ओळख वगैरे करून घेण्याचा प्रश्न नव्हता. शिवाय कोल्हापूरला शिकत असल्याने त्या भागाची माहिती फारशी नव्हती. विद्यार्थ्यांच्या एका गटातला एक सदस्य होतो; मात्र त्यावेळची चर्चा आजही कानात साठवून ठेवलेली होती. त्या सर्व प्रसंगाची आठवण दोन दिवसांपूर्वी आली. तेच रस्ते असले तरी आजूबाजूचा परिसर तळागाळातून बदलून गेला आहे. विट्याहून ढवळेश्वर आणि शेळकबावमार्गे भाळवणी फाट्यावरून येताना एकतीस वर्षांपूर्वी पाहिलेला हाच का तो परिसर! असे आश्चर्य वाटत होते व ढवळेश्वरचा माळ पूर्ण कूस बदलून गेला आहे. या दोन गावांच्या मधली संपूर्ण जमीन विविध उभ्या पिकांनी भरुन होती. कोठे ऊस उभा आहे, तर काही एकरांवर हळदीच्या पिकांचा गडद शालू दिसतो आहे. एकाने चक्क शेवग्याची दोन एकर शेती उभी केली आहे. कोणी केळी लावली आहे, कोणी आले केले आहे. सर्व प्रकारची पिके रानात उभी आहेत. एखादा एकराचा तुकडाही रिकामा दिसत नाही. विट्याच्या पुढे येताच भाळवणीचा रस्ता पकडताच उभ्या पिकांनी भरलेली शिवारे पाहून मनाला आनंद तर वाटत होताच त्याचवेळी १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपासून चर्चेतील ताकारी योजनेचा विषय मनात घर करून गेला होता. डॉ. पतंगराव कदम यांनीच १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत कडेगावला शेतकरी मेळावा घेतला होता. त्याची ही आठवण ताजी झाली. त्या मेळाव्यात चव्हाणसाहेब यांनी घोषणा केली होती की, ‘येत्या दोन वर्षांत ताकारी योजना पूर्ण करणार.’ याची बातमी ही या लेखाप्रमाणे त्यावेळी लिहिली होती. पुढे अनेक वर्षे गेली. अनेक निवडणुका झाल्या. असंख्य मोर्चे निघाले. धरणे आंदोलने झाली. मंत्र्यांचे दौरे झाले. अनेक मुख्यमंत्र्यांनी अर्धवट अवस्थेतील कृष्णा नदीवरील ताकारी येथील पंप हाऊसची पाहणी करण्याचे दौरेही पाहिले. ताकारी योजना काही पूर्ण होत नव्हती. आता त्याच ताकारी योजनेचे कृष्णा नदीतून उचलून दिलेले पाणी कडेगाव तालुक्याच्या (पूर्वीचा खानापूर तालुका) अनेक गावांची शिवारे भिजविते आहे.
ही योजना आखली १९८४ मध्ये. त्याचे भूमिपूजन २० मे १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. सागरेश्वरच्या घाटात झालेल्या या समारंभात देशातील सर्वांत मोठ्या उपसा योजनेला त्यावेळी ८३ कोटी ४३ लाख खर्च अपेक्षित आहे असे जाहीर केले होते. युतीच्या सरकारने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास ७ मे १९९७ रोजी पुन्हा मान्यता दिली. त्यावेळी या योजनेचा खर्च ४०२ कोटी ७ लाख रुपयांवर जाऊन पोहोचला होता. सुधारित प्रस्तावानुसार कडेगाव, खानापूर, तासगाव या तालुक्यांतील ६६ गावांतील २७ हजार ४०० हेक्टर (६८ हजार ५०० एकर) जमिनीला पाणी द्यायचे होते. यासाठी साडेनऊ टीएमसी पाणी उचलून देणे अपेक्षित होते, असे सांगण्यात येत होते.
दोन दशके उलटली; मात्र पाणी काही उचलून दिले गेले नाही. अखेर २००२ मध्ये ताकारी योजनेचे बटन दाबण्यात आले. तोवर ६३३ कोटी ५९ लाख रुपये खर्ची पडले होते; मात्र या योजनेवर आता ६ हजार ४०० हेक्टर म्हणजेच १६ हजार एकर शेती ओलिताखाली आली आहे.
वसंतदादा पाटील यांची ही संकल्पना अभिनवच होती. कऱ्हाडकडून वाहत येणारी कृष्णा नदी पुढे नृसिंहपूरपासून ताकारीवरून भिलवडीमार्गे सांगली-मिरजेकडे जाते. त्या नदीपासून केवळ काही किलोमीटर अंतरावरील कडेगाव तालुक्यातील अनेक गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाला सामना करावा लागत होता. ज्या गावांचे वर्णन प्रारंभी केले आहे, त्या गावच्या माळरानावर एखादे खरिपाचे पीक यायचं. त्यात ज्वारी आणि पसरट वेली असणाऱ्या शेंगा यांचा समावेश असायचा. पाऊस थोडाफार पडल्यास पीक साधायचं. दसरा-दिवाळीनंतर शेंगा काढण्याची घाई सुरू व्हायची. तोवर रानं एवढी वाळून जायची की, शेंगा काढण्यासाठी बैलांचा नांगरच जुंपावा लागत असे. बाकी माळरानावर कुसळाचे गवत उगवायचे. त्याचा काही उपयोग असायचा नाही. बहुतांश माणसं पोट भरण्यासाठी मुंबई-पुणे शहरांकडे जाण्याच्या नादात असायची. त्यामुळे सोनसळ-मुंबई गाडी १९७० च्या पूर्वीपासून सोनकिरे खोऱ्यातून जात असे. २००२मध्ये कृष्णा नदीवरील वाळवे तालुक्यातील ताकारी गावात उभ्या केलेल्या जॅकवेलमधून पाणी उचलण्यास सुरुवात झाली. चार टप्प्यांत उचललेल्या या पाण्याचा पाट आता कडेगाव तालुक्याच्या अनेक गावांच्या माळरानावरून वाहत जात आहे. गेल्या आठवड्यातही कालवे भरून वाहत होते.
शेती आणि पाणी याचा संबंध जाणणारे वसंतदादा पाटील यांनी किती सुक्ष्म विचार केला होता याचे आश्चर्य वाटते. सांगली, सातारा तसेच पुणे जिल्ह्यांच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामध्ये कडेगाव, खानापूर, आटपाडी, खटाव, माण, म्हसवड, फलटण, सांगोला, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आदी तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यांना बाहेरून पाणी आणून देण्याशिवाय पर्याय नव्हता. कडेगावपासून कोयनानगर केवळ ऐंशी किलोमीटरवर आहे. ती नदी आडवून १०८ टीएमसी पाणी अडविण्यात आले आहे. कोयनेत सुमारे ४००० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. इतक्या जवळ पाणी असूनही अनेक वर्षे सांगली-सातारा जिल्ह्यांचे पूर्व भाग दुष्काळाने ग्रस्त झालेले आहेत. त्या भागाला बाहेरून पाणी आणून देण्यावाचून पर्याय नव्हता. तोच मार्ग वसंतदादा पाटील यांना दाखवून दिला. पुढे ताकारी उपसा योजनेचा विस्तार करण्यात आला. मिरजेजवळ म्हैशाळपासून मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यासाठी पाणी देण्यासाठी योजना आखण्यात आली. तिला १९८६ मध्ये पाटबंधारे मंत्री शिवाजीराव देशमुख यांनी मान्यता दिली. त्या योजनेतून मिरजेच्या पूर्वेला पाणी उचलून देण्यात येते आहे. या दोन योजनांच्या उभारणीच्या काळातच सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अनेक गावे वंचित राहत होती म्हणून कऱ्हाडच्या बाजूला ओगलेवाडीजवळ टेंभू येथूनही पाणी उचलून देण्याचा निर्णय झाला. त्या योजनेला टेंभू योजना म्हणतात. या तिन्ही योजना देशातील सर्वांत मोठ्या उपसा पाणी योजना आहेत. सुमारे तीन लाख एकरांचे शेतीक्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
ताकारी योजनेने प्रारंभ केला; पण सर्वच पाणी योजनेप्रमाणे या तिन्ही योजनांकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष होत राहिले. सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करूनही अजून पन्नास टक्केसुद्धा यश मिळालेले नाही. ताकारीचेच उदाहरण घेतले तर उद्दिष्ट होते की, ६८ हजार ५०० एकर शेती ओलिताखाली आणायची होती; पण केवळ १६ हजार एकर क्षेत्र आतापर्यंत ओलिताखाली आले आहे. ज्या गावांचे शिवार ओलिताखाली आले आहेत, तेथील बदल पाहणे एक अर्थशास्त्रीय अभ्यास होऊ शकतो. यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या जन्मगावापासून सांगली-विटा रस्त्यावरील आळसंदपर्यंतची गावेच्या गावे पाण्यामुळे बहरली आहेत. यासाठी काही व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे. दुष्काळी भागाला पाणी दिले पाहिजे यासाठी नेहमी दबाव निर्माण करण्याचे काम क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांनी पाणी चळवळ उभारून केले. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि आमदार अनिल बाबर यांनी वारंवार शासन पातळीवर प्रयत्न करून निधी मिळवून दिला. युतीचे सरकार सत्तेवर असताना सांगली जिल्ह्यातून पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यात संपतराव देशमुख यांचा समावेश होता. त्यांनी एकमेव मागणी केली होती की, मला काहीही नको, मंत्रिपद दिले तरी नको, ताकारी योजना पूर्ण करण्यासाठी पैसे द्या!
हा सर्व प्रपंच पाहून वाटते की, शेतीला पाणी दिल्यानंतर कायापालट होतो. आज या पाणी योजनांवर चार साखर कारखाने चालतात. शिवाय इतर पिकांचीही लयलूट आहे. हळदीपासून आल्याची, शेवग्याची शेती शेतकरी करू लागला आहे. हा बदल खूप क्रांतिकारक आहे; पण ती दिसलीच नाही. कारण या योजना तीस-तीस वर्षे रखडल्याने क्रांतीऐवजी उत्क्रांतीप्रमाणे हळूहळू बदल होताना दिसत आहेत.
अलीकडच्या काळात डॉ. पतंगराव कदम यांनी या योजनांसाठी चांगला पुढाकार घेतला. कारण योजना झाल्या, पण त्या चालविण्याची यंत्रणाच उभी राहिली नाही. कृष्णा नदीतून वर आणून टाकलेले पाणी मुख्य कालव्यातून सायफण पद्धतीने पुढे जात राहते; पण संपूर्ण गावांचे संपूर्ण क्षेत्र भिजविण्यासाठी मुख्य कालव्याला जोडणारे पोटकालवे काढणे अपेक्षित होते. ते सर्व कालवे अजूनही व्हायचे आहेत. त्यामुळे मुख्य कालव्याच्या परिसरातील शेतीच फुलली आहे. पोटकालव्यांद्वारे सर्व दूरवर पाणी देणे शक्य असताना रखडलेल्या कामांमुळे ताकारी उपसा योजनेच्या यशाची अर्धी कहाणीच पाहता येते, अनुभवता येते. वास्तविक, ताकारीद्वारे येळावी बारमाही करण्यात आली. त्यावर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. ते भरून जातात तशीच योजना म्हैशाळ योजनेद्वारे अग्रणी नदीवर करण्यात आली; पण त्या योजनेची पाणीपट्टी वेळेवर भरली जात नाही. विजेची कोट्यवधीची थकबाकी आहे. परिणामी वीज जोडणीअभावी योजना सुरू होत नाही. ताकारीचा त्याला अपवाद आहे. कारण डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने साखर कारखान्यांनी पाणीपट्टीची जबाबदारी उचलली आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून परस्पर पाणीपट्टी दिली जाते आहे. हाच प्रयोग टेंभूवरही करता येऊ शकतो. टेंभू योजनेचा कालवा आता आटपाडी तालुक्यापर्यंत पोहोचला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक लहान-मोठे नदी-नाले बारमाही करता येऊ शकतात. अनेक पाझर तलाव आहेत. त्यामध्ये पाणीसाठा करता येऊ शकतो. शिवाय शेवटी या कालव्यातून आलेल्या पाण्याने माणगंगा नदी बारमाही करता येऊ शकते. देशपातळीवर नदीजोड वगैरे मोठ-मोठं बोलण्यापेक्षा अशी छोटी छोटी कामे करून एकीचे बळ देता येते. आज येळावी आणि अग्रणी नदीला बारमाही पाणी आले आहे. या योजनांचा हा परिणाम आहे. टेंभूद्वारे नांदणी, अग्रणी, माणगंगा या नद्या बारमाही करता येतील व मायणीच्या तलावासह अनेक तलाव पावसाळ्यातील कृष्णेच्या पुराच्या पाण्याने भरून घेता येतील; पण सर्व योजनांना लागणाऱ्या पैशाची तरतूद करावी लागेल. ती केव्हा होईल? नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरू केलेल्या पाणी चळवळीत मराठा क्रांती मोर्चाप्रमाणे लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली तर...? अन्यथा ताकारी योजनेच्या अर्ध्या कहाणीप्रमाणे अनेक वर्षांची प्रतीक्षा करीत रहावे लागेल. सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणात अकरा टीएमसी पाणी पडून आहे. ते सर्व पाणी वापरण्याची योजनाच कार्यान्वित झालेली नाही. ते पाणी दोन ठिकाणी उचलून माणदेशात देण्याची योजनाही पडून आहे. या सर्वाला बळ देण्यासाठी पैसा हवा. तो देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. जितका पैसा शासन देईल तेवढाच पैसा एका वर्षात निघू शकतो. आज कडेगाव तालुक्याचे वार्षिक उत्पन्न ताकारी योजनेवर खर्च केलेल्या ६७० कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. याचा अर्थशास्त्रीय अभ्यासही करावा लागेल तरच क्रांतिकारक बदल होईल. अन्यथा ताकारी योजनेच्या पाण्याची वाट पाहत एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली, असे पुढच्या पिढीचे व्हायला नको!
वसंत भोसले