बारावीच्या पेपरफुटीचे सत्र सुरूच
By Admin | Published: March 7, 2017 06:15 AM2017-03-07T06:15:11+5:302017-03-07T06:15:11+5:30
इयत्ता बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअॅप’वर फुटण्याचे सत्र सोमवारीही सुरूच राहिले
मुंबई /नवी मुंबई : इयत्ता बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअॅप’वर फुटण्याचे सत्र सोमवारीही सुरूच राहिले. गणिताचा पेपर सुरू होण्यास २० मिनिटे असताना १०.४० वाजता तो व्हॉट्सअॅपवर आला. पेपर परीक्षेपूर्वीच व्हायरल झाल्याची ही तिसरी घटना असल्याने परीक्षा यंत्रणेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणांना अटक झाली आहे.
वांद्रे येथील एमएमके परीक्षा केंद्राबाहेर एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर गणिताचा पेपर आढळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
पोलिसांनी आतापर्यंत राहुल भास्कर (२२), अझरुद्दीन शेख (२०), मोहम्मद अमन मोहम्मद इस्लाम शेख (१८) व सुरेश झा (२६) या चौघांना अटक केली आहे. सुरेश झा हा खासगी क्लासचा शिक्षक आहे. त्याने क्लासच्या विद्यार्थ्यांकरिता व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका शेअर केली होती. मोहम्मद शेख हा त्याच्याच क्लासचा विद्यार्थी असून तो बाहेरून बारावीची परीक्षा देत होता. त्यानेही स्वत:कडे आलेली मराठीची प्रश्नपत्रिका इतर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पाठवली होती. तर राहुल व अझरुद्दीन हे सिनीअर कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनीही स्वत:कडे आलेला पेपर व्हायरल केला होता. शिवाय संशयित विद्यार्थ्यांचे २० मोबाइल वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
त्यांच्यापर्यंत प्रश्नपत्रिका कोणी पाठवली, याच्या तपासाकरिता हे मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
>मुंबईत दोन ठिकाणी कॉपी
सोमवारी बारावीची परीक्षा सुरु असताना सकाळच्या सत्रात गणिताचा पेपर सुरू असताना वांद्रे येथील एमएमके महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला आणि मालाड येथील पी.डी. सुराखिया महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला कॉपी करताना पकडण्यात आले आहे. पेपरनंतर परीक्षा केंद्रावर त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली.
>दहावी परीक्षेसाठी शुभेच्छा!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षार्र्थींची संख्या ३८ हजारांनी वाढली आहे. बारावीचे पेपर ‘व्हॉट्सअॅप’च्या माध्यमातून फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
>असे फुटले पेपर..!
२ मार्च
मराठीचा पेपर
सकाळी १०.४६ ला
४ मार्च
सेक्रेटरीयल प्रॅक्टिसचा
पेपर १०.४७ ला
६ मार्च
गणिताचा पेपर सकाळी १०.४० वाजता