बारावीचे वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लांबणीवर, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By admin | Published: September 12, 2016 03:57 AM2016-09-12T03:57:34+5:302016-09-12T03:57:34+5:30
सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्यापही बारावीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही.
मुंबई : सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्यापही बारावीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अनेक विद्यार्थी वेळापत्रकाच्या प्रतिक्षेत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. बारावीचे वर्ष करीअरच्या दृष्टिकोनातून टर्निंग पाईंट असते. अकरावीपासून विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागतात. साधारण आॅगस्टच्या शेवटापर्यंत बारावीचे वेळापत्रक जाहीर केले जाते. यंदा सप्टेंबर महिना उजाडला तरी अजूनही बारावीचे वेळापत्रक घोषित केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार अभ्यासाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना तयार करायचे आहे. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
वेळापत्रक लवकरच
बारावीची फेरपरीक्षा नुकतीच झाली. या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर आहे. ते वेळापत्रक संकेतस्थळावरून काढण्यात आल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर अपलोड केले जाईल.
- सी. वाय. चांदेकर, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (प्रतिनिधी)