हलगर्जी १५ प्राध्यापकांवर कारवाई
By Admin | Published: June 8, 2017 12:58 AM2017-06-08T00:58:31+5:302017-06-08T00:58:31+5:30
उत्तरपत्रिका वेळेत जमा न करणे आदी विविध परीक्षांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या १५ प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परीक्षा मूल्यमापनाचे काम करताना विद्यार्थ्यांना चुकीचे गुण देणे, प्रश्नपत्रिकांचे अयोग्य वाटप करणे, अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न विचारणे, उत्तरपत्रिका वेळेत जमा न करणे आदी विविध परीक्षांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या १५ प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना करिअर घडविताना एक -एक गुणासाठी तीव्र संघर्ष करावा लागत असताना, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना प्राध्यापकांकडून अक्षम्य हलगर्जीपणा केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाकडून संबंधित प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे.
आझम कॅम्प येथील अल्लाना महाविद्यालयाच्या अंतर्गत परीक्षक प्रीती डांगे यांच्यावर अंतर्गत मूल्यमापनाचे गुण १५० ऐवजी ७५ पैकी दिले, त्यामुळे या विषयास बसलेले सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. याप्रकरणी डांगे यांना पुढील एक वर्ष परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल अँड केटरिंग टेक्नोलॉजीच्या संचालकांनी परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका वेळेत जमा न केल्यामुळे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई केली आहे. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. सचिन व्यवहारे व कनिष्ठ पर्यवेक्षक डॉ. भारती कुमार उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर अनुक्रमांक लिहून, त्यानंतर त्यावर पांढरी शाई लावल्याचे आढळून आल्याने त्यांना परीक्षेतील कोणतीही जबाबदारी देण्यास ३ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
कात्रज येथील ट्रिनिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे दादाराम जाधव व राजेंद्रप्रसाद पगारे यांची कायमस्वरूपी शिक्षा रद्द करीत तीन वर्षांची बंदी करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी पेपरफुटीचा अहवाल
१५ दिवसांत
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रश्नपत्रिका फुटून त्या व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या १५ ते २० दिवसांमध्ये प्राप्त होणार आहे. त्यानंतर संबंधितावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उत्तरपत्रिका व पुरवणी उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर वेगवेगळे असल्याबाबत मराठवाडा मित्रमंडळमधील कनिष्ठ पर्यवेक्षक सचिन थोरे यांच्यावर परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याबाबत डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या जाना देबश्री सैविक, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे प्रा. अवधूत पोळ यांच्यावर एक वर्षासाठी परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदीची कारवाई केली आहे.