दुकानांच्या अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Published: May 14, 2017 02:38 AM2017-05-14T02:38:55+5:302017-05-14T02:38:55+5:30

सलग चौथ्या दिवशी पालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला

Hammer on the encroachments of shops | दुकानांच्या अतिक्रमणांवर हातोडा

दुकानांच्या अतिक्रमणांवर हातोडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सलग चौथ्या दिवशी पालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. फक्त स्टेशन परिसराऐवजी कारवाई थेट वर्तकनगरपर्यंत करण्यात आली. फेरीवाल्यांना आधीच कुणकुण लागल्याने ते गायब झाल्याने दुकानांच्या अतिक्रमणांवर हातोडा घालण्यात आला.
स्टेशन परिसरात शनिवारी पालिकेच्या हाती काहीच सापडले नाही. त्यामुळे घाणेकर नाट्यगृह, लोकपुरम, टिकुजिनीवाडी रोड, विद्यापीठ, मानपाडा आदी भागांत दोन टीम करून पालिकेने कारवाईला सुरुवात केली. मात्र, ती सुरू होण्यापूर्वीच टीप मिळाल्याने फेरीवाल्यांनी गजबजलेले रस्ते आधीच सुनसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे फेरीवाल्यांवर किरकोळ कारवाई करून अतिक्रमण विभागाच्या पथकाने दुकानांचे वाढीव बांधकाम तोडून समाधान मानले. यामध्ये घोडबंदर हाय वे जवळील एका चायनीजच्या खुल्या रेस्टॉरंटआड सुरू असलेल्या बारवर कारवाई करण्यात यश मिळाले.
उपायुक्त संदीप माळवी यांना बुधवारी झालेल्या मारहाणीनंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाल्यांविरोधात आरपारची लढाई सुरू केली आहे. गुरुवारी सायंकाळी गावदेवीमधील गाळ्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर शुक्रवारी स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत फारसे हाती काही न आल्याने महापालिकेने रस्त्यावर तळ ठोकलेल्या वाहनांची हवा काढली. तसेच सॅटीसखालच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या.
दरम्यान, शनिवारी सुटीची कारवाई होणार नाही, असा कयास लावण्यात आला होता. परंतु, शनिवारी पुन्हा साडेचार वाजता कारवाईचा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवर पडला. त्यामध्ये एक टीम स्टेशन परिसर आणि दोन टीम वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, संजय हेरवाडे यांच्या पथकाने स्टेशन परिसरात गस्त घातली. परंतु, या परिसरात एकही फेरीवाला आढळून आला नाही. त्यानंतर, आयुक्तांनीदेखील या भागात पाहणी दौरा करून कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. शनिवारी रिक्षाचालकांनादेखील शिस्त लागली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, घाणेकर नाट्यगृहासमोरून कारवाई कशी करायची, असा प्लान सुरू असतानाच आधीच काही अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे पुढील भागांमध्ये हा मेसेज वाऱ्यासारखा पसरला आणि प्लानिंगमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या हाती निराशा येण्याची चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे लागलीच प्लान बदलून एका टीमचे रूपांतर दोन टीममध्ये करून कारवाई सुरू झाली. टिकुजिनीवाडी येथील काही फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर येथील दुकानदारांचे वाढीव बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. तसेच काही हातगाड्यादेखील तोडल्या. त्यानंतर, भवानीनगर भागातदेखील अशीच कारवाई करून पुढे मानपाड्याकडे या विभागाने कूच केले. परंतु, येथील फेरीवाल्यांना आधीच माहिती मिळाल्याने पालिकेच्या हाती फारसे काहीच लागले नाही.
मात्र, या भागात हाय वे पासून अगदी १५ फुटांच्या परिसरात चायनीजचा सुरू असलेला बार मात्र उद्ध्वस्त करण्यात यश आले. त्यानंतर, विद्यापीठ, लोकपुरम, तुळशीधाम या भागात कूच केले. परंतु, या भागातही गर्दी करून असणारे फेरीवाले पालिकेच्या हाती सापडलेच नाहीत. तुळशीधाममध्ये पार्क केलेल्या टेम्पोमध्ये विविध फळांचे घबाड मात्र पालिकेच्या हाती आले. ही फळे पालिकेने जप्त केली. तसेच या भागात काही हातगाड्यादेखील पालिकेने तोडल्या.
एकूणच मानपाडा, घाणेकर नाट्यगृह, तत्त्वज्ञान विद्यापीठ, वसंत विहार, लोकपुरम आदी भागांत अनेक फेरीवाले बसले असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात पालिकेचे पथक पोहोचण्याआधीच त्याची टीप मिळाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे काही तुरळक फेरीवाल्यांवर कारवाई करून पालिकेच्या पथकाने दुकानदारांवर आपली नजर वळवली.
फळे रूग्णालयात
या कारवाईत जप्त केलेली फळे, दूध हे कळवा रुग्णालय, सिव्हील रुग्णालय, वृद्धाश्रम, जिद्द शाळेत देण्याचा निर्णय या कारवाईदरम्यान घेण्यात आला.
रिक्षाचालकांना इशारा
रात्री ८ नंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शास्त्रीनगरकडे कूच केले. या वेळी रस्त्यात कशाही पद्धतीने उभ्या असलेल्या रिक्षाचालकांबाबत त्यांनी प्रथमच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. आज प्रेमाने समजवतो आहे, उद्या मात्र नाही ऐकलेत तर आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी मवाळ भाषेतच दिला. परंतु, या वेळी येथील फेरीवाल्यांसह चारचाकी आणि दुचाकींची हवा काढली.
>फेरीवाला धोरणाला थोडा वेळ लागणार!
‘‘या कारवाईला ठाणेकरांचे सहकार्य मिळत आहे, त्यामुळेच आम्ही कारवाई करीत आहोत, कारवाईच्या वेळेस विनंती करतो, माझ्या विनंतीला मान ठेवा. रस्त्यातच व्यवसाय करणे चुकीचे असल्याने त्यामुळेच कारवाई करणे भाग पडते. फेरीवाले अथवा इतर कोणी ऐकत नसतील, तर मात्र आम्हाला आमच्या पद्धतीने कारवाई करावीच लागते. फेरीवाला धोरणात नवीन समिती स्थापन करायची असल्याने त्याला थोडा वेळ लागणार आहे. परंतु, महापालिका हद्दीत फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्रे निश्चित केली आहेत. असे असतानाही फेरीवाले ना-फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. त्यांनी व्यवसाय करू नये, अशी आमची मुळीच इच्छा नाही. परंतु, त्यांनी नियमानुसार व्यवसाय करावा. ठाणेकर नागरिक या कारवाईमुळे खूश आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही कारवाई करतच राहणार आहे.’’
- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठामपा

Web Title: Hammer on the encroachments of shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.