ईशान्य मुंबईत अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Published: January 20, 2017 02:05 AM2017-01-20T02:05:30+5:302017-01-20T02:05:30+5:30
पालिकेने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
मुंबई : मतांसाठी भूमाफियांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय मंडळींची सध्या ईशान्य मुंबईत कोंडी होताना दिसते आहे. पालिकेने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. आचारसंहितेदरम्यान त्यावर दबाव आणणे त्यांना शक्य नाही. अशातच जो उमेदवार आपले बांधकाम रोखू शकत नाही त्याला मतदान का करायचे, असा सवाल उपस्थित करत मतदार त्यांच्याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
उत्तर पूर्व मुंबईत पालिकेतील दिग्गज नेते मंडळी आहेत. त्यात अनेक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची वाळवी वाढत आहे. त्यांच्यामुळे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द शिवाजी नगर परिसरात अनधिकृत बांधकामांना खतपाणी घातले आहे. भांडुपसह विक्रोळीच्या सूर्यानगर परिसरातील डोंगराळ भाग पूर्णपणे काबीज करण्यात आला आहे. भांडुप सोनापूर परिसरात हे बांधकाम तीन मजल्यांपर्यंत पोहोचले आहे. मतदारांना खूश करण्यासाठी ही नेते मंडळी त्यांना पाठीशी घालत असे. त्यात कारवाईसाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना यांच्या राजकीय दबावाला तोंड द्यावे लागत होते.
निवडणुकीच्या तोंडावर मात्र चित्र वेगळे आहे. पालिका अधिकाऱ्यांनी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालविण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत चाळीही पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या जात आहेत. आचारसंहितेत बांधकाम रोखण्याचा प्रयत्न अंगलट येण्याच्या भीतीने नेतेमंडळी शांत आहेत.
मात्र राजकीय नेत्यांच्या या भूमिकेमुळे अनधिकृत वस्तीत वसलेले रहिवासी, भूमाफिया त्यांच्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. आपला भावी नगरसेवक आपले घर वाचवू शकत नाही तर तो पुढे काय मदत करणार? या विचारांत हा मतदार वर्ग आहे. त्यांच्या मदतीसाठी पडद्याआड जमेल तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याने या मंडळींची कोंडी सुरू आहे. (प्रतिनिधी)
>मतदान करा... अनधिकृत बांधकाम वाचवा
याच संधीचा फायदा घेत विरोधक मंडळी अशा मतदारांना गाठून त्यांचे मतपरिवर्तन करताना दिसले. आम्हाला मतदान करा... निवडून आल्यावर तुमच्या बांधकामांना कोणीही हात लावणार नाही, असे आश्वासन देण्यातही ते मागे नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ईशान्य मुंबईत चर्चेचा विषय ठरणार आहे.