हातात घड्याळ.. कमळावर बाण!

By admin | Published: February 5, 2017 11:54 PM2017-02-05T23:54:25+5:302017-02-05T23:54:25+5:30

पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमलेली. एकाच घरातील पंधरा-वीस मंडळी तावातावानं आपलं गाऱ्हाणं सांगत होती. प्रत्येकाची तक्रार एकच होती, ‘आमच्या घरातला पांडोबा उमेदवार गायब

Hand in the clock .. arrow on the fort! | हातात घड्याळ.. कमळावर बाण!

हातात घड्याळ.. कमळावर बाण!

Next

पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमलेली. एकाच घरातील पंधरा-वीस मंडळी तावातावानं आपलं गाऱ्हाणं सांगत होती. प्रत्येकाची तक्रार एकच होती, ‘आमच्या घरातला पांडोबा उमेदवार गायब
झालाय.’
ठाणे अंमलदार : (कानात काडी घालून निवांतपणे फिरवत) हे बघाऽऽ तुम्ही असा कलकलाट कराल तर डायरीला नोंदच होणार नाही कसली. प्रत्येकानं शांतपणे मला नीट माहिती द्यायला पाहिजे.
पांडोबाची आई : मी सांगते अण्णासायब अगुदरऽऽ पांडोबा माजा मुलगा हाय.
अंमलदार : (लिहून घेत) अंऽऽ काय करतो पांडोबा?
वडील : (मिशाला पीळ देत) राजकारणात हाय. पाच वरसं सतरंज्या उचलत हुता. आता स्टेजवर भाषण ठोकतूया.
अंमलदार : अहोऽऽ त्याचा पोटपाण्याचा व्यवसाय काय?
भाऊ : ह्योच की राजकारणाचा.. टेंडर घेणं, वाटून देणं. नंतर वाटा घेणं.
अंमलदार : कधीपासून गायब झालाय?
वहिनी : काल सकाळपास्नं. अर्ज भरायला म्हणुनशान गेलेत... तिकडंच गायब. फोनबी नाय, मेशेजबी नाय.
अंमलदार: (पांडोबा भावी लोकप्रतिनिधी असू शकतो, हे लक्षात येताच पूर्णपणे भाषा बदलत) कोणत्या पक्षाकडून अर्ज भरलाय पांडोबारावांनी?
पत्नी : परवा रात्री झोपताना मला म्हणत होते की, ‘हातात हात घालून राजकारण केलेलं बरं. आज नाही तर उद्या साडेसाती संपेलच की यांचीबीऽऽ.’
अंमलदार : (नोंद करत) म्हणजे हाताचे अधिकृत उमेदवार आहेत पांडोबाराव.
वडील : (नकारार्थी मान हलवत) नाऽऽय. काल सकाळी त्यानं हातवाल्याचा येबी फॉर्म दिला टाकुनशान. मला म्हनाला, ‘अण्णाऽऽ घड्याळाचा गजर यैकायला लईऽऽ भारी वाटतूया नां? मग घिऊनशान टाकू त्यांचाच फॉर्म!’
अंमलदार : (हाताची नोंद खोडत) म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर ते उभारलेत.
आई : (कमरेला पदर खोचून) छ्या. छ्या. माज्या हातचा गोड च्या पिताना माजं लेकरू म्हनालं, ‘आयेऽऽ त्ये इंजिनवाले लईऽऽ मागं लागल्याती. या वॉर्डात मला अन् शेजारच्या वॉर्डात तुला तिकीट देतू म्हंत्याती. येकवर येक फ्री.’
अंमलदार : (गोंधळात पडत) म्हणजे इंजिनावर दोघं उभारलेत तुमच्या घरातले.
भाऊ : (ठसक्यात) नाय वो अण्णासायब... ‘माय-लेकराचा काळ’ गेला कवाच. कायबी फुकटात मिळतंया म्हणुनशान काय झालं, शेवटी ब्रॅण्डबी लई महत्त्वाचं असतंया ना? म्हणुनशान त्यानं घराभाईर पडल्यावर ‘धनुष्यबाण’वाल्याचा फॉर्म घेतला.
अंमलदार : (चरफडत पुन्हा खाडाखोड) म्हणजे ‘जय महाराष्ट्र’ म्हणा की.
वहिनी : ते बी नाय झालं... फॉर्म भरायला जाताना रस्त्यामंदी ‘हरेक माल’गाडीवर त्यांना ‘कमळ’ दिसलं. फकस्त ‘दोन पेटी’मंदी म्हनं कुणालाबी मिळत हुतं तिकीट. आमचे भावजी भौतेक तिकडंच गेले हायती.
अंमलदार : (आता मात्र खाडाखोडीच्या कागदाचा पूर्णपणे बोळा करून थेट टोपलीत) यानंतर कुठला बदल झाला नाही नां.. पांडूच्या भूमिकेत?
सारे जण एकसुरात : त्येच तर म्हैत नाय ना... कारण अर्ज भरल्यापास्नं त्यो गायबच झाला हाय. (एवढ्यात खुद्द पांडोबा स्वत: प्रकटतो)
पांडोबा : अण्णासायब... माज्या घरच्यांची कम्प्लेट घिऊ नगा. म्या ‘अपक्ष’ अर्ज भरूनशान आलूया... कारण आवंदा म्हनं अपक्षांच्याच ताब्यामंदीच ‘सत्तेची चावी’ राहणार हाय!
अंमलदार : अरेऽऽ पण.. कालपासून होतास कुठं ?
पांडोबा : (गालातल्या गालात हसत ) संमद्या नेत्यांना भेटुनशान आलू. ‘निकालानंतर तुमच्या भौमताचा आकडा वाढवायास्नी म्या हाईच,’ हे अगुुदरच त्यांना सांगुनशान आलूया न्हवं.’
- सचिन जवळकोटे

Web Title: Hand in the clock .. arrow on the fort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.