महिला डॉक्टरकडून महत्त्वाचे धागेदोरे हाती
By admin | Published: September 15, 2016 04:09 AM2016-09-15T04:09:28+5:302016-09-15T04:09:28+5:30
पनवेल येथील सनातन आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधाच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने ताब्यात घेतलेल्या गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर
कोल्हापूर : पनवेल येथील सनातन आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधाच्या साठ्याप्रकरणी ‘एसआयटी’ने ताब्यात घेतलेल्या गोवा आश्रमातील महिला डॉक्टर आशा ठक्कर, साधिका सुदेशना पिंपळे, निधी तावडे व श्रद्धा पवार यांच्या चौकशीत पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्र तावडे व विनय पवार यांचा पानसरे हत्येमध्ये थेट संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंबंधी आणखी काही पुरावे उपलब्ध करण्यासाठी तावडेकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी दिली.
दरम्यान, तावडेच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे त्याला सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात होण्याची शक्यता आहे.
संशयित तावडेला तपासासाठी पनवेल, वाशिम, संकेश्वर-बेळगाव, इचलकरंजी, वारणानगरसह शहरात आठ ठिकाणी फिरविले. त्याच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तावडेची ट्रॅक्स पानसरे हत्येच्या तपासात वेगळी दिशा देत आहे. मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रूद्रगौंडा पाटील, सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे व विनय पवार आदींचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासंबंधी तावडेकडे कसून चौकशी सुरू आहे. तावडे हा आजारपणाचे नाटक करून तपासाला बगल देत असल्याने पोलिस मारेकऱ्यापर्यंत अद्याप पोहोचलेले नाहीत. तावडेच्या चौकशीत जी माहिती हाती लागत आहे, त्यावर तपास पथके अभ्यासपूर्ण पडताळणी करत आहेत. (प्रतिनिधी)