तळेगाव नगर परिषदेवर ‘जनसेवा’चा हंडा मोर्चा
By admin | Published: March 4, 2017 01:22 AM2017-03-04T01:22:19+5:302017-03-04T01:22:19+5:30
अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांना कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव जनसेवा विकास समितीच्या वतीने शुक्रवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे व ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी केले. सत्ताधारी मित्र पक्षानेच मोर्चा काढून खुर्च्या खाली करण्याचा घरचा आहेर दिल्याने शहरात याची चर्चा सुरू
आहे.
मोर्चात सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक संग्राम काकडे, रोहित लांघे, सचिन टकले, नगरसेविका अनिता पवार, सुमित्रा दौंडकर, सलोनी तारकर, कल्पना साळुंके, चैताली देशमुख, सुरेखा वाडेकर, मंगल चिखले यांच्यासह महिला व नागरिक सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या केबीनमध्ये रिकामे माठ फोडून निषेध व्यक्त केला.
मुख्याधिकारी वैभव आवारे यांना या वेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी आवारे म्हणाल्या, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना प्रशासनाकडून काम करून घेता येत नसेल, तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. आम्ही प्रशासनाकडून पाणीप्रश्न मार्गी लावू. लोकप्रतिनीधी म्हणून स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
नगरसेवक खांडगे म्हणाले की, स्टेशन भागातील पाण्याच्या जटील समस्येमुळे महिलांच्या डोळ्यांत पाणी येण्याची वेळ आली आहे. पाणी वाटपात गाव आणि स्टेशन भाग असा जाणूनबुजून दुजाभाव केला जात आहे. आठ मार्चपर्यंत पाणीप्रश्न
मार्गी लागला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. विरोधी पक्षनेत्या खळदे यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. राजीव फलके, सुमित्रा दौंडकर यांनी पाण्यामुळे हाल होत असल्याबाबत तीव्र्र संताप व्यक्त केला.
नगराध्यक्षा जगनाडे म्हणाल्या, इंद्रायणी पाणीपुरवठा केंद्राच्या सक्षमीकरणाचे काम सुरू असून, ते पूर्ण होताच स्टेशन भागातील पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल.मुख्याधिकारी आवारे यांनी मोर्चेकरांना आश्वासन देताना सांगितले की, ८ मार्चपर्यंत स्टेशन भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य
करावे. (वार्ताहर)
समस्येचे निराकरण करा
स्टेशन भागास अपुऱ्या दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे महिलांना जाच सहन करावा लागतो. पाण्याच्या गैरसोईमुळे प्रचंड हाल होत आहेत. इंद्रायणी जॅकवेलमधून होणारा पाणीपुरवठा सुरू होण्यास बराच अवधी लागू शकतो.
त्यामुळे पाणीप्रश्नाच्या या गंभीर समस्येचे युद्धपातळीवर निराकरण करावे. शहरातील प्रत्येक भागाला वेगवेगळ्या वेळात पाणी सोडावे, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा आणि पाण्याचे वेळापत्रक
तयार करावे, अशा मागण्या या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.