अडतमुक्त बाजाराची शत्तकोत्तर परंपरा
By Admin | Published: December 24, 2014 12:21 AM2014-12-24T00:21:59+5:302014-12-24T00:21:59+5:30
जळगाव जामोद कृउबासच्या पावलावर महाराष्ट्राचे पाऊल !
जयदेव वानखडे/जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्या अडतमुक्त करण्याचे धोरण सध्या चांगलेच गाजत आहे. अडतमुक्त धोरण ११0 वर्षापासून बुलडाणा जिलतील जळगाव जामोद येथे राबविले जात आहे. शेतकर्यांचे हित जोपासणारी ही राज्यातील एकमेव अडतमुक्त बाजार समिती आहे. याच पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रातील बाजार समित्या अडतमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता, परंतु त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शेतकर्यांच्या शेतमालाची सहज विक्री व्हावी त्याला योग्य भाव मिळावा या उद्देशाने उदय झालेल्या बाजार समितीच्या उद्देशाला जळगाव जामोद येथे खर्या अर्थाने मूर्तरूप दिले आहे. सध्या या बाजार समिती अंतर्गत येणार्या आसलगाव, जळगाव जामोद, पिंपळगाव या सर्व केंद्रावर शेतमालाची अडतमुक्त खरेदी-विक्री होत आहे. जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्यांचा आलेला माल आलेल्या क्रमांकानुसार लावला जातो. मार्केटची माणसे हाराशी पावती बनवतात व एक कर्मचारी धान्य हातात घेवून बोलीस सुरूवात करतो व जो व्यापारी जास्त भाव देईल, त्या नावे हाराशी पावती बनवून देतो. त्या तीन प्रतीत असतात. त्यापैकी एक प्रत शेतकरी, एक व्यापारी तर एक बाजार समितीकडे राहते. त्यानंतर सदर व्यापार्याच्या काट्यावर माल नेवून शेतकरी ठरलेल्या भावानुसार आपला माल मोजून देतात व पैसे आणि रिकामा बारदाना घेवून अडत न कापल्याने समाधानाने परततात. शेतकरी हिताचे लक्ष ठेवून त्यांना विना अडत चोख मोजमाप, नगदी चुकारा आणि खुल्या पद्धतीने हाराशी पद्धतीचा अवलंब केला. येथे शेतकरी माल विकला त्याच पैसा घेवून मोकळा होतो. त्यामुळे त्याला इतर बाजार समित्यांमध्ये माल नेणार्या शेतकर्यासारखे नुकसान सोसावे लागत नसल्याचे जळगाव जामोदची कृउबास माजी सभापतीचे प्रसेनजित पाटील यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. *खुल्या लिलाव पद्धतीने धान्याची हाराशी, चोख मोजमाप आणि तेही पोत्यांमध्येच. नगदी चुकारा आणि तोही विना अडत तसेच याठिकाणी शेतकर्यांच्या शेतमालाला चाळणी लावली जात नाही. ही या बाजार समितीची वैशिष्ट्ये आहे. वर्षाकाठी ७ ते ८ लाख क्विंटल धान्याची खरेदी विक्री या समितीच्या सर्व यार्डामधून होत असल्याने ३ ते ४ कोटी रूपयांची अडत वाचते पर्यायाने हा शेतकर्यांचाच फायदा होतो.