‘इसिस’चा हस्तक अटकेत
By Admin | Published: July 24, 2016 05:13 AM2016-07-24T05:13:23+5:302016-07-24T05:13:23+5:30
केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी कल्याण येथून इसिसच्या हस्तकाला अटक केली. त्याने केरळमध्ये काही तरुणींचे
कल्याण : केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने संयुक्तपणे कारवाई करून शनिवारी कल्याण येथून इसिसच्या हस्तकाला अटक केली. त्याने केरळमध्ये काही तरुणींचे धर्मांतर करून त्यांचा मुस्लिम तरुणांशी निकाह लावून दिला व त्यांना इसिसमध्ये सामील होण्यास भाग पाडले, असा त्याच्यावर आरोप आहे.
रिझवान खान (४७) असे अटक करण्यात आलेल्या इसिस हस्तकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत केरळमधून २१ जण बेपत्ता झाले आहेत. हे सगळे इसिसमध्ये भरती झाल्याचा दाट संशय केरळ पोलिसांना आहे. त्यामुळे या बेपत्ता लोकांचा शोध तेथील पोलीस घेत असताना तेथे राहणाऱ्या मरियम नावाच्या ख्रिश्चन मुलीचे धर्मांतर करून मुस्लीम मुलासोबत लग्न लावून तिला इसिसमध्ये भरती केल्याची शक्यता तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे व्यक्त केली. (प्रतिनिधी)
केरळमध्ये कारवाया...
- केरळ पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा कसोशीने शोध घेतला असता नवी मुंबईच्या अर्चित कुरेशी व कल्याणच्या रिझवान खान या दोघांनी त्यांचे लग्न लावून दिल्याचे उघड झाले. विवाहनोंदणीच्या कागदपत्रांवर दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- रिझवानने त्या जोडप्याचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी मदत केल्याचेही समोर आले. त्यामुळे केरळ पोलीस आणि एटीएसने दोन दिवसांपूर्वी कुरेशी याला नवी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती.
- कुरेशी हा डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये’ काम करत असल्याचे चौकशीत उघड झाले. तर, कल्याणच्या रिझवानची केवळ चौकशी करून सोडून दिले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी रिझवानला मुंबईच्या भोईवाडा न्यायालयात हजर केले असता
२५ जुलैपर्यंत कोठडी सुनावली.
कोण हा रिझवान खान?
कल्याणच्या पत्रीपूल येथील सूर्यमुखी-लोकसुरभी सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील १०२ क्र.च्या फ्लॅटमध्ये रिझवान खान राहत आहे. त्याची पत्नी रुकाया, मुलगी फतिमा, मारियान आणि मुलगा बिलाल असा परिवार आहे. त्याची मुले कल्याणच्या इकरा उर्दू शाळेत शिक्षण घेतात. विक्र ोळी येथे राहणारे अंजुम सलीम भाटकर यांच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये आॅक्टोबर २०१४ पासून रिझवान भाड्याने राहत आहे. फ्लॅट भाड्याने घेताना आपण मुलांच्या शिकवण्या घेण्याचे काम करीत असल्याचे त्याने घरमालक भाटकर यांना सांगितले होते. ५० हजार रु पये डिपॉझिट आणि दरमहा ७ हजार रु पये भाडे या बोलीवर त्याला फ्लॅट देण्यात आला. मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत असल्याचे त्याने सोसायटीतील रहिवाशांना सांगितले होते. रिझवान, त्याची पत्नी व मुले सोसायटीत कोणाशी जास्त बोलत नसत. रिझवानचा स्वभाव शांत असून त्याचे कोणाशी बोलणेच नसल्याने त्याचे कुणाशी भांडणही नव्हते. मात्र, त्यांच्याकडे कोणती मुले शिकवणीसाठी येत होती, याची माहिती कोणालाच नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. रिझवानच्या घराला कुलूप असल्याने त्याच्या घरातून पोलिसांना काय सापडले, याचा तपशील कळू शकला नाही. त्याचे कुटुंबीय कुठे आहेत, याचाही शोध लागू शकला नाही. स्थानिक बाजारपेठ पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. घर भाड्याने देताना घरमालकाने भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना कळवणे आवश्यक असल्याचे वारंवार पोलीस सांगतात. मात्र, रिझवानला फ्लॅट भाड्याने देणारे घरमालक भाटकर यांनी त्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली नव्हती, अशी माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे आता भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करायचा किंवा कसे, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.