दिल्लीबद्दल कानावर हात
By admin | Published: January 22, 2015 01:25 AM2015-01-22T01:25:47+5:302015-01-22T01:25:47+5:30
दिल्लीत विधानसभा निवडणुकीवरुन राजकारण पेटलेले असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
अण्णा हजारेंची चुप्पी : गरज पडल्यास करणार आंदोलन
अहमदनगर : दिल्लीत विधानसभा निवडणुकीवरुन राजकारण पेटलेले असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. त्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही, असे स्पष्ट करत आपचे अरविंद केजरीवाल असो किंवा भाजपाच्या किरण बेदी दोघांपासून चार हात लांब असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, नव्या भाजपा सरकारचे पाऊल वेडेवाकडे पडल्यास आंदोलनाचे सूतोवाचही त्यांनी केले आहे.
दिल्ली विधानसभेसाठी मध्यावधीची घोषणा होताच देशाच्या राजधानीचे राजकारण तापले आहे. बेदी यांच्या भाजपाप्रवेशानंतर तर राजकारणाला अधिकच रंग चढला आहे. अण्णांच्या भ्रष्टाचार निर्मूलन चळवळ आणि जनलोकपाल आंदोलनाच्या माध्यमातून केजरीवाल आणि बेदी या दोन्ही शिष्योत्तमांनी जम बसवत पुढे राजकारणात प्रवेश केला आहे. राजकीय पक्ष काढल्याने केजरीवाल यांच्याशी अण्णांचे आधीच बिनसले आहे. आता बेदीही भाजपात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा याबद्दल काय बोलतात, याविषयी माध्यमांना उत्सुकता होती. मात्र अण्णा याबाबत बोलण्यास टाळत आहेत. बुधवारी माध्यम प्रतिनिधींनी याबाबत अण्णांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.
बेदी किंवा केजरीवाल यांना आशीर्वाद देण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्याला त्यांच्या राजकारणाबद्दल काही बोलयाचे नाही, असे ते म्हणाले. मात्र गरज पडली तर दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील भाजपा सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सध्यातरी अपेक्षेप्रमाणे मार्गक्रमण करीत आहे. मात्र पुढे या सरकारची पाऊले वेडीवाकडी पडली तर आंदोलन केले जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, किरण बेदी यांनी भाजपा प्रवेशानंतर अण्णांशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र अण्णांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, असे वृत्त दिल्लीच्या माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे अण्णा त्यांच्यावरही नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र राळेगळसिद्धी येथे जनलोकपालसाठी झालेल्या आंदोलनाच्यावेळीच बेदी यांचा भाजपाप्रती असलेला ओढा स्पष्ट झाला होता. (प्रतिनिधी)
च्मुंबई : किरण बेदी यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार केल्यामुळे दिल्लीतील भाजपा कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांची निदर्शने व घोषणाबाजी सुरू असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी दिवसभर मुंबईत होते. महाराष्ट्रातील सदस्य नोंदणी, नवीन प्रदेशाध्यक्षांची नवी संभाव्य टीम अशा काही बाबींवर त्यांनी चर्चा केल्याचे समजते.
दिल्लीत भाजपामध्ये बेदींच्या उमेदवारीवरून असंतोष धुमसत असताना शहा हे कोलकात्यावरून मुंबईत आले. दिवसभर त्यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहात होता. राज्यातील काही भाजपा नेत्यांची शहा यांनी भेट घेऊन चर्चा केली. भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेची प्रगती, नवीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नव्या कार्यकारिणीतील नियुक्त्या याबाबत चर्चा झाल्याचे समजते. शहा हे सायंकाळी एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले.