कानून के हात बहोत लंबे हो गये है - मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 07:04 PM2017-09-03T19:04:32+5:302017-09-03T19:04:36+5:30
कानून के हात लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. क्राईम कंट्रोल अॅन्ड ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) मुळे देशातील कोणत्याही व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका क्लिकवर शोधली जाऊ शकते.
नागपूर : कानून के हात लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. क्राईम कंट्रोल अॅन्ड ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) मुळे देशातील कोणत्याही व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका क्लिकवर शोधली जाऊ शकते. त्यामुळे कानून के हात बहोत लंबे हो गये है..., हे ध्यानात घ्यावे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे राज्य पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यात नागपूर शहर पोलीस वर्षभरात किती खरे उतरले, त्याचे मुल्यमापन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी तिरपुडे इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट एज्युकेशन या शैक्षणीक संस्थेच्या माध्यमातून तयार करवून घेतले. २०१४ च्या तुलनेत नागपूर पोलिसांचे सध्याचे कामकाजाची पद्धत कसे आहे, वर्तन कसे आहे, महिला-मुली, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक यांना पोलिसांबद्दल काय वाटते, पोलिसांच्या चांगल्या-वाईट कामकाजाचे नागपूरकरांनी कसे मुल्यमापन केले, किती गुण दिले, ते या ह्यजनवाणीह्ण (सर्व्हे) च्या रुपाने पुढे आले आहे. त्या आधारे बनलेले पोलिसांचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी १२ वाजता पर्सिस्टंटच्या प्रतापनगरातील सभागृहात जाहीर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, समीर मेघे, डॉ. परिणय फुके, प्रकाश गजभिये, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शहर पोलिसांच्या कामगिरीचे तोंडभरून कौतूक केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्रीपदही आपल्याकडेच असल्याने नागपुरात कोणती घटना घडली की त्याची लगेच राष्ट्रीय बातमी बनविली जाते. त्यामुळे शहर पोलिसांची अतिरिक्त जबाबदारी वाढली होती. मात्र, गेल्या वर्षभरात शहर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासोबतच भूमाफियांचे कंबरडे मोडले. वाहतूक व्यवस्था वळणावर आणली. भरोसा सेल, बडी कॉप, एनकॉप्स एक्सीलन्स, ट्रॅफिक क्लब, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा असे अनेक प्रशंसनीय उपक्रम पोलिसांनी राबविले. गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावरही भर दिला. विविध उपक्रमातून जनतेत मिसळण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे जनतेने पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली आहे.
स्वातंत्र्यापूर्वीेचे पोलीस इंग्रजांपुढे जनतेला नतमस्तक करण्यासाठी काम करायचे. आता जनतेच्या सेवेसाठी पोलिसांनी काम करायचे आहे, हे ध्यानात घ्यावे. भूमाफिया, गुन्हेगार यांना कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. तर, सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांबद्दल विश्वास वाटला पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, अशा प्रकारे जनतेकडून आपल्या कामकाजाचे मूल्यमापन करवून घेणारे नागपूर पोलीस राज्यातील पहिले पोलीस दल ठरले आहे. त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. मात्र, येथे थांबून चालणार नाही. याहीपेक्षा जास्त चांगली कामगिरी बजावण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आली आहे. पुढच्या सर्व्हेक्षणात यापेक्षा एक टक्का गुण जरी कमी मिळाले तर टिकेचा सामना करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.
मुख्यमंत्र्यांचा मूड
मुख्यमंत्री फडवणीस आज चांगल्याच मुडमध्ये होते. कार्यक्रमाचे खुसखुशीत संचलन करताना पोलीस उपायुक्त राहूल माकणीकर यांनी ह्यमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सखोल मार्गदर्शन करावे, असे म्हणत त्यांना भाषणाला निमंत्रीत केले. हसत हसत माईकजवळ आलेल्या मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवातच मिश्किलपणे केली. माकणीकर यांनी असे काही खोलवर संचालन चालविले आहे की मला आता सखोल मार्गदर्शन करण्याची गरजच उरली नाही, असे म्हणत त्यांनी सभागृहात हंशा पिकवला.
आपल्या प्रास्तविकात पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी शहर पोलिसांनी वर्षभरात बजावलेल्या कामगिरीचा आढावा घेताना आम्ही (नागपूर पोलीस) पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत शेवटून पहिले असल्याची खंत व्यक्त केली. आपल्याला आता त्यात सुधारणा करायची असून, ७ दिवसात पासपोर्ट व्हेरिफिकेशन पार पडेल, अशी व्यवस्था करायची आहे, असे म्हटले. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे देशातील कोणत्याही भागात राहणा-या व्यक्तीची पार्श्वभूमी एका क्लिकने शोधता येते. त्यामुळे त्या व्यक्तीवर कोणता गुन्हा कधी दाखल झाला ते कळते. मग व्हेरिफिकेशनसाठी ७ दिवसांचा अवधी का म्हणून लागावा, असा प्रश्न करीत त्यांनी पोलीस आयुक्तांकडे पाहून २४ तासात व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पार पडली पाहिजे, असे म्हणत आयुक्तांकडून तशी तयारी वदवून घेतली.
मुंबई पोलीस २४ तासात ही प्रक्रीया पार पाडतात. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत नागपूर पोलिसांनी मागे का असावे, असा प्रश्नही त्यांनी मिश्कीलपणे उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सीसीटीएनएसला आधारची लिंक जोडण्याचे प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीची माहिती झटपट पुढे येईल, कुणी लवपाछपवी करू शकणार नाही, हा प्रकार कानून के हात अब बहोत लंबे हो गये है, हे दर्शविणारा आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
मुंबईत पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात सीसीटीव्ही नेटवर्कचा खूप फायदा झाला. कोणत्या ठिकाणी काय स्थिती आहे आणि तेथे काय मदत केली पाहिजे, ते पोलिसांना नियंत्रण कक्षात बसून कळत होते. नागपूरसह राज्यातील अनेक शहरात सीसीटीव्ही नेटवर्कचा खूप फायदा होणार आहे. पोलिसांना त्यांच्या मालकी हक्काची घरे मिळवून देण्यास शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तत्पूर्वी, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी आपल्या भाषणातून शहर पोलिसांच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. मुल्यमापनात ज्या पोलीस ठाणे आणि अधिका-यांना जनतेने चांगले गूण दिले. त्या अधिकारी कर्मचा-यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रास्तविकातून नागपूर पोलिसांचे उपक्रम सांगितले. तुकडोजी महाराज, संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच्या अनेक रचना ऐवकत पोलीस उपायुक्त राहूल माकणीकर यांनी कार्यक्रमाचे सुरेल संचालन केले. तर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आभार प्रदर्शन केले.
पोलीस आयुक्तांचा संकल्प
तत्पूर्वी, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी आपल्या भाषणातून शहर पोलिसांच्या कामगिरीचा धावता आढावा घेतला. आतापर्यंत गुणवत्तापूर्वक सेवेला प्राधान्य देत आम्ही लोकोपयोगी उपक्रम राबविले. २०१४ ला तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना यांनी पोलिसांच्या कामकाजाचे मुल्यमापण करवून घेतले होते. त्यातून प्रेरणा घेऊन यावेळी आम्ही आमच्या कामकाजाचे मुल्यमापन करवून घेतले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आमचे प्रोत्साहन वाढले आहे,असे सांगून डॉ. व्यंकटेशम यांनी आता शहराला भिकारीमुक्त तसेच ड्रग फ्री सिटी बनवायचे आहे, असा संकल्प जाहिर केला. १० वी / १२ वीत ९४ टक्के गूण घेणारे मुलं-मुली व्यसनाच्या मागे लागून अभ्यासाचे नावच घेत नाही, अशा तक्रारी त्यांच्या पालकांनी आपल्याकडे केल्या आहेत. त्यामुळे दारू, गांजा, चरस, गर्दसोबतच हुक्का पार्लरही आपल्याला बंद करायचे आहे, असे आयुक्त म्हणाले. मुल्यमापनात ज्या पोलीस ठाणे आणि अधिका-यांना जनतेने चांगले गूण दिले. त्या अधिकारी कर्मचा-यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रास्तविकातून नागपूर पोलिसांचे उपक्रम सांगितले. तुकडोजी महाराज, संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच्या अनेक रचना ऐवकत पोलीस उपायुक्त राहूल माकणीकर यांनी कार्यक्रमाचे सुरेल संचालन केले. तर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी आभार प्रदर्शन केले.