पोलिसांच्या हक्कासाठी सरसावले हात
By admin | Published: September 21, 2016 12:39 AM2016-09-21T00:39:30+5:302016-09-21T00:42:08+5:30
स्वाभिमान संघटनेतर्फे राबविण्यात आली सह्यांची मोहीम
कोल्हापूर : सण, उत्सव, कुटुंबातील सुख-दु:खांच्या प्रसंगीसुद्धा कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या पोलिसांची संघटना झाली पाहिजे, या न्याय्य हक्काच्या समर्थनार्थ मंगळवारी शेकडो हात पुढे आले.
पोलिसांनाही त्यांचा अधिकार मिळावा म्हणून आमदार नीतेश राणे यांनी २५ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पोलिसांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविणारी पोलिस संघटना असावी, यासाठी तसेच पोलिसांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहोचावेत यासाठी आमदार राणे यांच्या मार्गदर्शनासाठी मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर घेण्यात आलेल्या या मोहिमेचा प्रारंभ सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त पंढरीनाथ मांढरे यांच्या हस्ते झाला. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस, संतोष कांबळे, स्वाभिमान संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर उपस्थित होते. सह्णांची ही मोहीम राज्यभर राबविण्यात आली आहे. कोल्हापुरात दोन दिवस मोहीम घेण्यात आली.
आता कोल्हापुरात मुख्यालयात स्वाक्षरी मोहीम झाल्यावर आज, बुधवारपासून जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांसमोर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर फलकावर केलेल्या सर्व स्वाक्षऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहेत.
- सचिन तोडकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमान संघटना, कोल्हापूर.