‘हात’सफाई की नालेसफाई
By Admin | Published: June 6, 2017 02:11 AM2017-06-06T02:11:34+5:302017-06-06T02:11:34+5:30
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीदेखील मुंबई महापालिकेची नालेसफाई पूर्ण झालेली नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला, तरीदेखील मुंबई महापालिकेची नालेसफाई पूर्ण झालेली नाही. मिठी नदीसह छोटे आणि मोठ्या नाल्यांच्या साफसफाईबाबत प्रशासन आकड्यांचे दावे करत असले, तरीदेखील प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. महापालिका प्रशासन आणि विरोधी पक्षांनी केलेल्या नालेसफाई पाहणीतून ही तफावत यापूर्वीच आढळून आली असून, आता तर महापालिका प्रशासनावर नालेसफाईच्या कामाहून टोकाची टीका होऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे, नाल्यांसह मिठीची अवस्थाही अगदी वाईट असून, अपूर्ण नालेसफाईमुळे मुंबई तुंबण्याची भीती जागृत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यानुसार, मे महिन्याच्या चौथ्या आठवड्याच्या अखेरीस मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे ८६.८७ टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरू आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील. मोठ्या नाल्यांच्या सफाईद्वारे साधारणपणे १ लाख ९१ हजार ६८२ मेट्रिक टन एवढा गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी सुमारे १ लाख ६६ हजार ५२२ टन गाळ काढून व वाहून नेण्यात आला आहे. याचाच अर्थ, नालेसफाईची कामे ८६.८७ टक्के एवढी झाली आहेत.
...आणि आयुक्तांनी ठणकावले
पावसाळीपूर्व कामांच्या दोन डेडलाइन उलटल्या, तरी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे अर्धवट आहेत.
विरोधकांनी पाहणी दौऱ्यातून याचा पर्दाफाश केल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेण्यास आयुक्तांनी सहायक आयुक्तांना ठणकावले आहे.
>खेळ आकड्यांचा
गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण १ लाख ८९ हजार १४४ मेट्रिक टन एवढा गाळ काढून, वाहून न्यावयाचा होता. यापैकी गेल्या वर्षी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांमधून सुमारे १ लाख ३६ हजार ४३८ मेट्रिक टन एवढा गाळ काढून वाहून नेण्यात आला होता. म्हणजेच, गेल्या वर्षी हे प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते.
मोठ्या नाल्यांमधून १३ हजार ७२८ मेट्रिक टन (८०.६८ टक्के) एवढा गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण ५९.७८ टक्के एवढे होते. या वर्षी पश्चिम उपनगरांमध्ये ९२ हजार ९२० मेट्रिक टन (८२.०८ टक्के), तर पूर्व उपनगरांमध्ये ५९ हजार ८७४ मेट्रिक टन (९७.४३ टक्के) एवढा गाळ काढून वाहून नेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये ८४.३४ टक्के, तर पूर्व उपगनरांमध्ये ६८.६१ टक्के एवढे होते.
मिठी नदीमधील गाळ काढून वाहून नेण्याचे कामदेखील प्रगती पथावर असून, ८०.४९ टक्के काम पूर्ण झाले आहे, असा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिकेचे दावे
पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प पडू नये, म्हणून पाचही पंपिंग स्टेशनमधील पाणीउपसा करणाऱ्या पंपांची तपासणी करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील फक्त खड्डे न भरता, संपूर्ण पॅच भरून घेण्यात आले आहेत.
मोठे नाले, छोटे नाले यांचा गाळ काढण्याची कामेही ९५ टक्केपेक्षा जास्त झाली आहेत.
येथे लागणार पालिकेचा कस...
मुंबई शहरात भायखळा, चिंचपोकळी, वरळी, दादर हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केटसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सखल भाग, मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो, कमानी सिग्नल या व्यतिरिक्त विद्याविहार बस स्थानक परिसर, पश्चिम उपनगरात मिलन सब वे, अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरासह पश्चिम उपनगरातील सखल भागासह ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते. विशेषत: सदर परिसरातील छोटे आणि मोठे नाले साफ होत नसल्याच्या कारणात्सव येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता आणि गांधी मार्केट येथे पाणी साचल्याने, पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे ठप्प होतो, तर लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कुर्ला डेपो आणि कमानी सिग्नल येथे पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावतो. पश्चिम उपनगरात सांताक्रुझ येथील मिलन सबवेमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक व्यवस्था कोलमडते. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात सदर ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात.
आयुक्तांचे आदेश...
पावसाचे पाणी नेहमी भरण्याचा इतिहास असलेल्या ठिकाणी सर्व विभागात सुमारे अडीच हजार कर्मचारी गणवेशात कर्तव्यावर उपस्थित राहतील, याची खबरदारी घ्या.