युग चांडक हत्याकांड प्रकरणातील आरोपींची फाशी कायम
By admin | Published: May 5, 2016 04:56 PM2016-05-05T16:56:21+5:302016-05-05T17:05:02+5:30
संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या युग चांडक अपहरण व खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा कामय ठेवली आहे
युगला नाल्यात पुरून डोक्यावर ठेवला होता दगड -
निष्पाप आणि असहाय्य बालक युग चांडक याचे अपहरण केल्यानंतर दोन्ही नराधमांनी त्याला सावनेर मार्गावरील लोणखैरी येथे नेऊन निर्घृण खून केला होता आणि तेथील नाल्यात मृतदेह गाडून युगच्या डोक्यावर मोठा दगड ठेवला होता. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटीसमोरून अपहरण केले होते. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता खुद्द डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता.
फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव ह्यमोहसीन खानह्ण असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. ह्ययुग हमारे कब्जे मे है, पाच करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आनाह्ण, असे अपहरणकर्ता म्हणाला होता. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी आरोपींच्या कबुलीवरून युगचा मृतदेह गवसला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. तत्पूर्वी युगच्या अंगावरील शाळेचा निळ्या रंगाचा टी शर्ट आरोपीने काढून घेतला होता.
हा शर्ट डॉ. चांडक यांना दाखवून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु राजेश पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच अरविंदने हा शर्ट लोणखैरीच्याच एका नाल्यात फेकला होता. पोलिसांनी युगचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो मेयो इस्पितळाकडे रवाना केला होता. युगचे शवविच्छेदन ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेयो इस्पितळात डॉ. अविनाश वाघमोडे, डॉ. एच. के. खरतडे आणि डॉ. एम. एस. गेडाम यांच्या पॅनलने केले होते. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा त्यांनी अभिप्राय दिला होता. मृतदेहावर २६ जखमा होत्या. त्यापैकी २२ जखमा मृत्यूपूर्वीच्या आणि ४ मृत्यूनंतरच्या होत्या. मृत युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३६४-अ, १२० -ब, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.