अंजनाबाईच्या मुलींच्या फाशीला उशीर झाला नाही
By admin | Published: November 20, 2014 02:28 AM2014-11-20T02:28:07+5:302014-11-20T02:28:07+5:30
न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला,
मुंबई : चोरी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे व सीमा गावित यांच्या दयेचा अर्ज अर्ज निकाली काढण्यासाठी उशीर झाला नसल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात केला़
न्या़व्ही़एम़ कानडे व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली़ त्यात केंद्र सरकारने रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करून वरील दावा केला, तर राज्य शासनाने युक्तिवाद करताना ही भूमिका मांडली़ ते ग्राह्य धारीत न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली़ १९९० ते आॅक्टोबर १९९६ या काळात अंजनाबाई, शिंदे व तिचा पती तसेच गावित यांनी चोरी व भीक भागण्यासाठी १३ मुलांचे अपहरण करून यातील ९ जणांची हत्या केली़ या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता़ यात शिंदेचा पती माफीचा साक्षीदार झाला व अंजनाबाईचे कारागृहात निधन झाले़
या गुन्ह्यासाठी दोषी धरीत २००१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली व उच्च न्यायालयाने २००४ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब केले़ २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही फाशी योग्य असल्याचा निर्वाळा दिला़ त्यानंतर या दोघींनीही दयेसाठी प्रथम राज्यपाल व त्यापाठोपाठ राष्ट्रपतींकडे स्वतंत्र अर्ज केला, मात्र त्यांचे अर्ज फेटाळले़ या सर्व प्रक्रियेत आठ वर्षे गेली़ कारागृहातील चांगले वर्तन बघता त्यांचे पुनर्वसनही होऊ शकते़ त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्याचे जन्मठेप रूपांतर करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका या दोघींनी उच्च न्यायालयात केली आहे़ याचे प्रत्युत्तर सादर करताना केंद्र व राज्य शासनाने वरील दावा केला़