हनुमान चालीसा नुसती पाठ असून चालणार नाही, तर ती...

By अतुल कुलकर्णी | Published: May 8, 2022 07:04 AM2022-05-08T07:04:28+5:302022-05-08T07:04:46+5:30

हल्ली सगळ्या गोष्टी झटपट शिकवता आल्या पाहिजेत, हे आजच्या गुरुजींना सांगितलं पाहिजे. घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान नसतो.

Hanuman Chalisa is not just a lesson, but it is ... | हनुमान चालीसा नुसती पाठ असून चालणार नाही, तर ती...

हनुमान चालीसा नुसती पाठ असून चालणार नाही, तर ती...

Next

- अतुल कुलकर्णी

प्रिय अब्राहम लिंकन मास्तर 
रामराम...
आमच्या पोरांना काल गरमगरम भजे आणले होते... कागदात गुंडाळून. भजे खाल्ले आणि पेपरात तुमचा फोटो दिसला. तुम्ही तुमच्या मास्तरांना पत्र लिहिलेलं दिसलं... जमाना बदललाय, तसा पत्राचा मायना बदलला पाहिजे की नाही लिंकन मास्तर...? हल्लीच्या जमान्यातसुद्धा सगळीच माणसं सत्यनिष्ठ नसली तरी न्यायप्रिय असतात. या गोष्टी पोरांना शिकविल्या पाहिजेत. मात्र, त्याला हे पण सांगायला पाहिजे की, आजच्या जगात प्रत्येक चांगल्या माणसामागे एक तरी बदमाश असतोच. तो स्वार्थी असतो की नाही आम्हाला माहिती नाही, पण मी काय म्हणतो लिंकन मास्तर, स्वार्थी म्हणजे काय, याची व्याख्या आता बदलली पाहिजे की नको? उगीच आपलं अवघं आयुष्य देशाला समर्पित करणारे म्हणजे भारी आणि आपल्या खानदानासाठी आयुष्य समर्पित करणारे भ्रष्ट, हे काही बरोबर नाही मास्तर... त्यांनी त्यांच्या पिढीसाठी लेकराबाळांसाठी काही केलं नाही तर मग कोण करणार त्यांच्यासाठी...?

हल्ली सगळ्या गोष्टी झटपट शिकवता आल्या पाहिजेत, हे आजच्या गुरुजींना सांगितलं पाहिजे. घाम गाळून कमावलेला एकच छदाम, आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान नसतो. हार स्वीकारू नये हे त्याला सांगितले पाहिजे. हार म्हणजे पराभव बरं का लिंकन मास्तर.... नाही तर तुम्ही म्हणाल, हार म्हणजे गळ्यात घालायचा हार.... तो कोणी वेगळा खासगीत आणून देत असेल, तर तो आपण घेतला पाहिजे. त्याविषयी संकोच करू नये हे आजच्या पिढीला सांगितलं पाहिजे!  आजच्या पोरांना हनुमान चालिसा नुसती पाठ असून चालणार नाही तर ती रस्त्यात कुठेही उभे राहून बिनदिक्कत म्हणता आली पाहिजे... त्यामुळे देशाची सेवा होते आणि आपण देशभक्त होतो, हे त्याला ठासून सांगितलं पाहिजे. आपला आनंद दणक्यात साजरा करता आला पाहिजे आणि आलेला रागही तेवढ्याच दणक्यात व्यक्त केला पाहिजे. या गोष्टी आजच्या पिढीला फार कामाच्या आहेत, असं नाही का वाटत तुम्हाला लिंकन मास्तर..?

भल्यानं वागायचा जमाना राहिलेला नाही, हे आजच्या पोराबाळांना सांगितलं पाहिजे. टग्या लोकांशी त्यांच्या भाषेत वागलं पाहिजे. उगाच एक मारली की दुसरा गाल पुढे करण्याचा जमाना राहिलेला नाही... स्वतःचे ज्ञान दाखवून पैसे कमवायचे दिवस आता आहेत का लिंकन मास्तर... त्याऐवजी स्वतःचे मसल्स दाखवून, दादागिरी करून काम करून घेण्याचे दिवस आले आहेत. तुम्ही कधी काळी लिहिलेलं, मी हातात असलेल्या पेपरात वाचलं. ‘कधीही विक्रय करू नये, हृदयाचा आणि आत्म्याचा’ असं तुम्ही लिहिलं होतं.
 पण त्यावर भजे आणि तेलाचे डाग पडले होते. असेही डाग पडलेले विचार आता काय कामाचे..? धिक्कार करणाऱ्या झुंडी आल्या तर त्याच्याकडे कानाडोळा करू नये. उलट आपणही जास्त जोराने त्याचा धिक्कार करावा. या गोष्टी आजच्या पोराबाळांना शिकविल्या पाहिजेत लिंकन मास्तर... सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून लढत राहा, असं तुम्ही लिहिलेलं पेपरात दिसत आहे. मात्र, कोणी आपल्या नादी लागला तर त्याचा हिशोब लगेच कसा करायचा, या गोष्टी आजच्या काळात जास्त महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे  लिंकन मास्तर... तुमचं पत्र आजच्या पिढीला काही कामाचं नाही हो.

आजच्या पिढीला आपण सतत प्रसिद्धीच्या झोतात कसे राहू, काय केलं म्हणजे आपल्या बातम्या छापून येतील, आपले फोटो पेपरात येतील, चॅनलवाले आपल्याकडे येतील, याचे शिक्षण देणं फार महत्त्वाचं झालं आहे. फार बौद्धिक, प्रामाणिक विचार कोणी दाखवीत नाही, छापत नाही. त्यामुळे सनसनाटी निर्माण करता आली पाहिजे. काहीतरी मस्त बोललं पाहिजे, म्हणजे छापून येईल हे आजच्या पोरांना शिकवायला पाहिजे लिंकन मास्तर... चाटूगिरीपासून सावध राहा, असं तुम्ही सांगता. मात्र, त्याशिवाय आजच्या काळात पान हलत नाही लिंकन मास्तर... हे तुमच्या कसं लक्षात आलं नाही. जमाना बदलला आहे. तेव्हा तुम्ही आता नव्याने पत्र लिहा आणि सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगा. तुमचं पत्र असं भजे, वडापाव बांधून येणाऱ्या पेपरात नको. उगाच तुमचे विचार तेलकट होतात आणि आम्हालाही ते बरं वाटत नाही. काही केलं तरी तुम्ही आमचे एकेकाळचे गाजलेले मास्तर आहात, लिंकन मास्तर... असो, थांबतो आता.

- तुमचाच 
बाबूराव

Web Title: Hanuman Chalisa is not just a lesson, but it is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.