विवाहितेवर अतिप्रसंग, तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 08:45 PM2017-09-26T20:45:49+5:302017-09-26T20:45:55+5:30
नव-याला व तुला ठार मारू अशी धमकी देत विवाहित महिलेवर तिघा युवकांनी वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे घडली.
बांदा : नव-याला व तुला ठार मारू अशी धमकी देत विवाहित महिलेवर तिघा युवकांनी वारंवार अतिप्रसंग केल्याची घटना शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे घडली. याबाबत त्या पीडित महिलेने बांदा पोलिसात मंगळवारी तक्रार दिली. या प्रकरणातील संशयित तीन युवकांंपैकी निखिल उर्फ मोहन शंकर आरोसकर (२२) व साईनाथ बाबा धुरी (३२, दोघेही रा. शेटकरवाडी) या दोघांना बांदा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली. तर तिसरा संशयित गौरेश केरकर हा कामानिमित्त बाहेर गेल्याने पोलिसांना सापडला नाही.
याबाबत बांदा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिलेली माहिती अशी की, शेर्ले-दुकानवाडीतील या पीडित महिलेचा विवाह ११ मार्च २०१६ रोजी झाला होता. यानंतर तिच्या नव-याचा मित्र असलेला निखिल हा जानेवारी महिन्यात पीडित महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी आला होता. ती महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकगृहात गेली असता निखिल याने तिच्या मोबाईलवरून तिचा नंबर घेतला. त्यावरून त्याने तिला धमकी दिली. शारीरिक संबंध करू न दिल्यास तुला व तुझ्या नव-याला ठार मारू असे सांगत तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यामुळे त्या विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली नाही. दरम्यान निखिल याने याबाबत आपले मित्र साईनाथ व गौरेश यांना सांगत त्या महिलेचा मोबाईल क्रमांक दिला. त्यांनीही तिच्या घरी जात तुझ्यात आणि निखिल यांच्यातील संबंधाची माहिती तुझ्या नव-याला सांगू अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला.
तर काही दिवसांपूर्वी ती विवाहिता आपल्या माहेरी गेली असता यातील निखिल याने तिला मोबाईलवरून धमकी देत बोलावून घेत पुन्हा अतिप्रसंग केला. मात्र आपल्या पतीला व आपल्या जीवाला धोका होईल या भीतीने तिने ही गोष्ट सांगितली नाही. हा प्रकार जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत घडला. वारंवार होणाºया या त्रासामुळे ती विवाहिता मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून तिने मंगळवारी या तिघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिली.
बांदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली ही महिला प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. बांदा महिला पोलिसांनी तिला धीर देत तिची तक्रार घेतली व या प्रकरणातील तिघांपैकी दोघांना तत्काळ अटक केली. तर यातील तिसरा संशयित गौरेश हा कामाला बाहेर गेल्याने पोलिसांना आढळून आला नाही. या पीडित महिलेचा पती हा बांद्यात एका वाहनावर खासगी चालक म्हणून कामाला आहे. तर हे तिघे संशयित या महिलेच्या पतीचे मित्र असल्याचे निष्पन्न झाले.
बांदा पोलीस स्थानकात गर्दी
शेर्ले येथील महिलेवर अत्याचार झाल्याची माहिती सर्वत्र पसरताच चर्चेला एकच उत आला होता. तर याबाबत महिलेने तक्रार देऊ नये यासाठी तिच्या पतीची मनधरणीही केली जात होती. मात्र त्या महिलेची नातेवाईक असलेल्या वकील युवतीने तक्रार कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे सांगितले.
माझा संसार उद्ध्वस्त करणा-यांना शिक्षा व्हायलाच हवी
ही महिला तक्रार देत असताना काही जणांनी यामध्ये तुझीच बदनामी होईल असे सांगत त्या महिलेच्या पतीला तक्रार देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी आता काय इज्जत राहिलीय? खाल्लेल्या ताटात घाण करणाºया या नराधमांना शिक्षा व्हायलाच अशी मागणी त्याने करत तक्रार मागे न घेण्याचा निश्चय व्यक्त केला.