चतुरस्त्र मराठी अभिनेत्री वंदना गुप्तेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
By Admin | Published: July 16, 2016 11:26 AM2016-07-16T11:26:35+5:302016-07-16T13:44:14+5:30
मराठी नाटकं व चित्रपटात विविध भूमिका करणा-या चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १६ - ‘अभिनेत्री’, ‘चारचौघी’, ‘अखेरचा सवाल’, ‘ज्याचा त्याचा प्रश्ना’, ‘सुंदर मी होणार’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘श्री तशी सौ’, ‘सोनचाफा’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अनेक नाटके व चित्रपटांमध्ये काम करणा-या चतुरस्त्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा आज (१६ जुलै) वाढदिवस.
वंदना गुप्ते यांच्या अनेक नाटकांमधील भूमिका गाजल्या मात्र खरी ओळख मिळाली ती ‘अखेरचा सवाल’ या नाटकानं. अरुण जोगळेकर, दया डोंगरे, दत्ता भट या मंडळींबरोबरच विजया मेहताही या नाटकात काम करत होत्या. कर्करोगग्रस्त नंदू नावाच्या मुलीची ती भूमिका होती. चाळीस वर्षांपूर्वी हे नाटक आलं होतं. ती स्वतः खेळाडू असते आणि तिची आई डॉक्टतर असते. अनेकदा खेळता खेळता तिच्या पोटात दुखतं. ती मैदानावर कोसळते. त्यानंतर लक्षात येतं की तिला कर्करोग आहे ते. मात्र तिचे आई-वडील तिला हे सांगत नाहीत. पण नंतर तिला ते कळतं. मग ती आईला सांगते की कशाला खर्च करते आहेस. मला माहीत आहे मला काय झालं आहे ते. या नाटकात विजयाबाईंनी आईची भूमिका साकारली. दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं ‘सोनचाफा’ हे नाटक फार गाजले. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या या नाटकात काम केल्यामुळे एका स्वाभिमानी स्त्रीचं जगणं कसं असतं, ह्यात एका स्वाभिमानी स्त्रीची ही भूमिका होती. चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महेश मांजरेकर यांच्या ‘मातीच्या चुली’ या चित्रपटात त्यांचा सहज सुंदर अभिनय आपल्याला बघायला मिळाला, खरं तर ‘पसंत आहे मुलगी’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका मा.माणिक वर्मा तिच्या आई होत. वंदना गुप्ते यांनी अभिनयाच्या क्षेत्रात विविध माध्यमातून लोकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केले आहे.
मा.वंदना गुप्ते यांनी चित्रपटापेक्षा नाटकांत अधिक कामे केलीआहेत. त्यांनी ५९ नाटके केली आहेत व विविध नाटकांचे दीड हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत. सुयोग, चंद्रलेखा, श्री चिंतामणी अशा नामांकित नाट्यसंस्थांमध्ये काम केलं आणि आताही करीत आहेत.
मा.वंदना गुप्ते यांना लोकमत समूहातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.