ठाणे : २ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 07:05 PM2024-08-18T19:05:44+5:302024-08-18T19:06:43+5:30
बदलापूरमध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे.
कोलकाता येथील हृदयद्रावक घटना ताजी असताना देशातील इतरही भागांमधून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. बदलापूरमध्ये एकाच शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषण झाल्याची बाब समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे.
दोन्ही मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १२ ते १३ ऑगस्टला हा प्रकार घडला होता. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाला माहिती दिल्यावर मुलींची खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी नंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणावरून माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजन सिंगने संताप व्यक्त केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
आम्हा लोकांची काय चूक आहे... मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की, त्यांनी अशा मानसिकतेच्या लोकांवर अतिशय कठोर कारवाई करावी, असे हरभजनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टॅग करत म्हटले.
महत्त्वाचे -
- बदलापुरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्यामुळे शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थी देखील नराधमांपासून सुरक्षित राहू शकत नाही ही बाब समोर आली आहे.
- हा प्रकार त्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना सांगितल्यामुळे उघडकीस आला. त्यामुळे याआधी इतर कोणत्या विद्यार्थिनीसोबत असा प्रकार घडला आहे काय याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
- हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल १२ तास रखडवून ठेवण्यात आले आणि बारा तासानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.