हार्बर ब्लॉकचा प्रवाशांना फटका
By admin | Published: February 21, 2016 02:04 AM2016-02-21T02:04:53+5:302016-02-21T02:04:53+5:30
हार्बर मार्गावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या ७२ तासांच्या जम्बो ब्लॉकने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील
मुंबई : हार्बर मार्गावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या ७२ तासांच्या जम्बो ब्लॉकने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. लोकलला पर्याय म्हणून टॅक्सीकडे वळलेल्या लोकांकडून वाढीव भाडे उकळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
हार्बरवरील ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेने शुक्रवारी १४५ फेऱ्या रद्द केल्या, त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. शनिवारीही हार्बर मार्गावर सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या केवळ वडाळा स्थानकापर्यंतच धावत होत्या. परिणामी, प्रवाशांना वडाळा ते सीएसटीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी टॅक्सी आणि बेस्टवर अवलंबून राहावे लागले. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार, टॅक्सी चालकांनी संबंधितांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारले.
रविवारी मध्यरात्रीपर्यंत जम्बो ब्लॉक असल्याने, हार्बर मार्गावरील सीएसटी ते वडाळ्यापर्यंतची वाहतूक या काळात पूर्णत: ठप्प राहणार आहे. (प्रतिनिधी)
जम्बो ब्लॉक अंतर्गत फलाटांचा विस्तार, सिग्नल यंत्रणेचे बळकटीकरण, रुळांचे मार्ग बदलणे ही कामे करण्यात येत आहेत.
रविवारी मध्यरात्री ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून हार्बरवरील सेवा पूर्ववत होईल.
रविवारी वडाळा ते पनवेलदरम्यान दर ८ मिनिटांनी, वडाळा ते बेलापूर व वडाळा ते वाशीदरम्यान दर ३२ मिनिटांनी, वडाळा ते वांद्रेदरम्यान दर १६ मिनिटांनी लोकल चालवण्यात येतील.
गर्दीच्या वेळेमध्ये एका तासात वडाळा ते पनवेलदरम्यान
१५ फेऱ्या आणि इतर वेळेत एका तासात १२ गाड्या
चालवण्यात येतील.
सीएसटीवरील फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण होण्यास ३५ दिवस लागतील, शिवाय वडाळा रोड व डॉकयार्ड रोड येथील प्रलंबित कामही पूर्ण करण्यात येईल. ही कामे पूर्ण झाल्यावर ३१ मार्चपर्यंत हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाहाचे रूपांतर डीसीवरून एसीमध्ये करण्यात येईल. - अमिताभ ओझा,
विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे
अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनचालकाविरोधात विभागातर्फे कारवाई सुरू असते. ब्लॉकदरम्यान वडाळ्यात कारवाईसाठीची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. काही तक्रार असल्यास प्रवाशांनी विभागाशी संपर्क साधावा.
- जयंत ससाणे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वडाळा