हार्बरचे तीनतेरा

By admin | Published: July 19, 2016 05:22 AM2016-07-19T05:22:48+5:302016-07-19T05:22:48+5:30

तांत्रिक बिघाडांची मालिका मध्य रेल्वेच्या हार्बरवर सुरूच असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सुमारास हार्बर रेल्वेचे तीनतेरा वाजले.

Harbor's three stars | हार्बरचे तीनतेरा

हार्बरचे तीनतेरा

Next


मुंबई : तांत्रिक बिघाडांची मालिका मध्य रेल्वेच्या हार्बरवर सुरूच असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सुमारास हार्बर रेल्वेचे तीनतेरा वाजले. या बिघाडामुळे ३५ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एका लोकलच्या पेंटाग्राफमध्ये मशीद बंदर स्थानकाजवळ बिघाड झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हार्बर रेल्वे सेवा दीड तास विस्कळीत राहिली आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
सोमवारी दुपारी १.१३ वाजता सीएसटी-वाशी लोकल मशीद बंदरजवळ येताच लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. हा बिघाड होताच, सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल सेवांवर त्याचा परिणाम झाला आणि लोकल जागीच थांबल्या. तोपर्यंत लोकलच्या पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम रेल्वेकडून हाती घेण्यात आले. मात्र, हा बिघाड दुरुस्त करण्यास कर्मचाऱ्यांना बराच वेळ लागत होता. त्यामुळे हळूहळू त्याचा परिणाम सीएसटीकडे येणाऱ्या लोकल सेवांवरही होऊ लागला. प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून त्यांना त्याच तिकिटांवर मेन लाइनमार्गे पुढच्या स्थानकांपर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. पेंटाग्राफमधील बिघाड दुरुस्त करण्यास दुपारचे २.२३ वाजले आणि त्यानंतर दुपारी २.४0 च्या सुमारास हार्बरवरील डाउन लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. लोकल पूर्ववत होण्यास जवळपास दीड तास लागल्याने लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. सायंकाळी उशिरापर्यंत लोकल गाड्यांना लेटमार्कच लागत होता. या बिघाडामुळे एकूण ३५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
बिघाड झालेली लोकल ही जुनी रेट्रोफिटेड लोकल होती. अशा लोकलमुळे हार्बरवर बिघाडांचे सत्र सुरू असून, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Harbor's three stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.