हरित महाराष्ट्र अभियानाला पावसाचा खोडा!
By admin | Published: July 7, 2015 12:00 AM2015-07-07T00:00:37+5:302015-07-07T00:00:37+5:30
वृक्षरोपणाला अल्प प्रतिसाद; वनाच्छादनाखालील जमीन वाढविण्यासाठी प्रयत्न.
हर्षनंदन वाघ / बुलडाणा : महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या हेतूने वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान श्रमदानातून राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र पावसाने दडी दिल्याने या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ३३ टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे आवश्यक असताना हे क्षेत्र केवळ १६ टक्के एवढे आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त ९.६ टक्क्य़ांपर्यंत र्मयादित आहे. ३३ टक्क्यांपर्यंत वनाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यात हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद आदींच्या सहकार्याने रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार होते; मात्र पाऊस नसल्यामुळे या अभियानाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
*वृक्षारोपणाला अल्प प्रतिसाद
या अभियानातंर्गंत झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावांच्या अनेक भागात वाहनाद्वारे फिरती विक्री करण्याचे सुचवण्यात आले आहे. याशिवाय रोप विकत घेणार्यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्षप्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणी व नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार होता; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपे घेणार्यांची व वृक्षारोपण करणार्यांची संख्या अल्प असल्याचे दिसून येत आहे.