हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

By admin | Published: May 31, 2017 04:49 AM2017-05-31T04:49:21+5:302017-05-31T04:49:21+5:30

मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे.

Haritarajeva Sakarele's dream of 'Make in India' | हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

हरितऊर्जाच साकारेल ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करायचे असेल तर वीज आणि वाहतुकीवरील खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यास एकाचवेळी पर्यावरण संवर्धन आणि अर्थव्यवस्थेला गती देणे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.
पर्यावरणपूरक बंदरांची निर्मिती आणि समुद्रातील तेलगळतीसंदर्भात नरिमन पॉइंट येथील शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सभागृहात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘ग्रीन पोर्ट्स अ‍ॅण्ड आॅइल स्पिल मॅनेजमेंट २०१७’ या नावाने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की, कांडला बंदरात सौर आणि पवनऊर्जेच्या माध्यमातून २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाची चाचपणी चालू आहे. दीड लाख एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच पद्धतीने देशभरातील बंदरे, गोदामे आणि मोठ्या सरकारी आस्थापनांवर सौरपॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचा मानस असून, त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
या चर्चासत्राच्या माध्यमातून बंदरासाठी हरितऊर्जा निर्मितीचे नवनवे मार्ग समोर येतील; तसेच समुद्रातील तेलगळतीसारख्या दुर्घटनांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक पद्धती विकसित करण्यास मदत होईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर, पेट्रोलियम पदार्थांच्या या आयातीमुळे देशाच्या व्यापारात मोठी तूट निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी हरितऊर्जा निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचे इंडियन फेडरेशन आॅफ ग्रीन एनर्जीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले.
देशातील महत्त्वाच्या बंदरांत सध्या १६ मेगावॅटची सौर तर सहा मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. २०२२पर्यंत या माध्यमातून १७५ मेगावॅट वीजनिर्मितीचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

जेएनपीटी बंदराची क्षमता वाढवणार
उरण : जेएनपीटी बंदरातील अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात गुजरातकडे सरकू लागला आहे, या आरोपामध्ये काही तथ्य नसून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विविध विकासकामांमुळे बंदराची क्षमता वाढणार असल्याचे केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उरण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराला रेल्वेशी जोडणाऱ्या जासई जेएनपीटी मार्गावरील १५ किमी अंतराच्या तिसऱ्या रेल्वेमार्गाचा शिलान्यास कार्यक्रमप्रसंगी जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर, माजी खा. रामशेठ ठाकूर, भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, ट्रस्टी महेश बालदी, उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते

Web Title: Haritarajeva Sakarele's dream of 'Make in India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.