निष्ठूर पोलीस हवालदार गजाआड
By admin | Published: February 20, 2017 05:30 PM2017-02-20T17:30:24+5:302017-02-20T17:30:24+5:30
पोलीस हवालदार अरविंद लालबच्चन पांडे (वय ५४) याच्यावर अखेर गिट्टीखदान पोलिसांनी पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - पोलीस हवालदार अरविंद लालबच्चन पांडे (वय ५४) याच्यावर अखेर गिट्टीखदान पोलिसांनी पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला रविवारी रात्री अटक केली. सुनीता अरविंद पांडे (वय ५०) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव असून, १६ फेब्रुवारीला पोलीस क्वॉर्टरमध्ये तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. लोकमतने हे प्रकरण लावून धरतानाच पांडेचा निष्ठूरपणाही अधोरेखित केला होता, हे विशेष!
सुनीताचे २० वर्षांपुर्वी (१९९७) अरविंद पांडेसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर ती वारंवार आजारी पडू लागली. त्यानंतर ती मनोरुग्ण बनली. या स्थितीत ती घराबाहेर निघून जात होती. हवलदार पांडे तिच्यावर औषधोपचार करण्याऐवजी तिला क्रूरपणे घरात डांबून ठेवू लागला. गेल्या वर्षी सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी त्याचा हा निष्ठूरपणा उघड केला. त्यानंतरही त्याने तिला रुग्णालयात पाठविण्याऐवजी घरातच डांबून ठेवणे सुरू केले. हे करताना तो पाच-पाच दिवस घराकडे फिरकत नव्हता. आठवड्यातून एखादवेळा यायचा. दुसरीकडे खायचा अन् दुसरीकडेच राहायचा. दोन आठवड्यापुर्वी पांडेने तिला घरात डांबले अन् निघून गेला. घरात खायला अन्न नव्हते आणि दाराला बाहेरून कुलूप लावून असल्यामुळे घराबाहेर जाऊन दुस-या कुणाला मागायची सोय नव्हती. त्यामुळे सुनीता बिचारी बंद दाराच्या आड आपल्या वेदना पोटात गिळून मूक आक्रंदन करू लागली. अन्नाचा दाना पोटात नसताना तििच्या पोटातील अल्सर फुटला. त्यामुळे असहाय सुनीता तडफडत मेली. तिचा मृतदेह कुजला. दुर्गंध सुटल्यामुळे गुरुवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी गिट्टीखदान ठाण्यात माहिती कळविली. गिट्टीखदान पोलीस पांडेच्या घरी पोहोचले. तेथे सुनीता पांडे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तो मेयोत पाठविला.
वैद्यकीय अहवालातून खुलासा-
सुनीताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय अहवाल देताना ह्यसुनीता अनेक दिवसांपासून उपाशी होती अन् तिच्या पोटात अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झालाह्ण, असे नमूद केले. शासकीय निवासस्थान असूनदेखिल तेथे लाईट न लावता पांडे पत्नी सुनीताला अंधारात घरात डांबून ठेवत होता. तिच्या औषधोपचार आणि खाण्यापिण्याची व्यवस्था न केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला पांडेचा निष्ठूरपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी आरोपी पोलीस हवालदार अरविंद पांडे याच्याविरुद्ध कलम ३०४, ३४२ आणि ३४४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आली.