ग्रामीण महाराष्ट्राच्या जिद्दीला सलाम

By admin | Published: December 5, 2014 11:00 AM2014-12-05T11:00:14+5:302014-12-05T11:13:02+5:30

चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला.

Harmony of rural Maharashtra | ग्रामीण महाराष्ट्राच्या जिद्दीला सलाम

ग्रामीण महाराष्ट्राच्या जिद्दीला सलाम

Next

त्या तिघींनी उलगडली संघर्षाची गाथा : शौचालयासाठी ठेवले दागिनेही गहाण

‘लोकमत वुमेन समिट’ची आजची दुपार देश-विदेशातून येथे आलेल्या अनेकांसाठी काहीशी धक्कादायकच ठरली. व्यासपीठावर जातानाही संकोच करणा-या, माईकवर बोलताना बिचकणाऱ्या त्या तिघी. चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला. ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करत होत्या.
‘बोलायला काय घाबरायचं?’ या सवालातून निडरपणा दाखविताना कुशीवर्ता साळोख म्हणाल्या, ‘‘शाळेचं स्वच्छता अभियान सुरू झालं. दुसऱ्याची लेकरं येतात, हगणदारी स्वच्छ करतात, तिथं जाऊन घाण करणं मनाला पटंना. म्हणून ठरवलं संडास बांधायचा; पण परिस्थिती नव्हती.
लग्नानंतर तीन वर्षांनी मालक वारले़ २ वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी आले़ भावाने आधार दिला़ १२ वर्षे राहिल्यावर स्वत:चं मातीचं घर बांधले; पण त्याच्याही दोन भिंती पडलेल्या. जवळ मोलमजुरी करून केलेली चांदी होती. पैशासाठी तीच गहाण ठेवली आणि संडास बांधून दाखवला. आता गावातल्या लोकांनाही त्याचं अप्रूप वाटायला लागलंय.’’

महिलांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील शौचालयासारख्या सुविधेसाठीही महिलांना द्याव्या लागत असलेल्या लढ्याची कहाणी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकताना संपूर्ण सभागृह अवाक् होऊन गेले. त्या तिघींनी आपले दागिने विकून शौचालय उभारलेच. त्यांच्या कृतीचा आदर्श घेत अनेक गावांत चळवळ सुरू झाली. या जिद्दीला मान्यवरांनी सलाम केला. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार केला.
------------
लग्नाला १२ वर्षे झाली. तेव्हापासून ‘त्यांना’ म्हणत होते; पण परिस्थितीमुळे त्यांच्याकडूनही टाळाटाळ होत होती. मुलगी ११ वर्षांची झालीय. शौचालय नसल्याने आपल्या वाट्याला जे आलं, ते तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून या वर्षी संडास बांधायचाच ठरवला. मोलमजुरी करून पैसेही गोळा केले. शेवटी मिस्त्रीची मजुरी द्यायला शिल्लक नव्हती. मग मंगळसूत्रच विकलं; पण संडास बांधलंच. सौभाग्याचं लेणं विकलं म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं, की ५ हजारांची साडी अन् दोनपदरी डोरली घातली तरी संडास नसल्याने डबा घेऊन जाता, तर तुमची पत शून्य आहे.’’ - संगीता आव्हाळे, स्वच्छतादूत, अमरावती जिल्हा
------------
कुशीवर्ताबार्इंच्या शहरी महिलांना टिप्स
‘बसून राह्यलं की व्यायाम होत नाही’ असे सांगत कुशीवर्ताबार्इंनी शहरी महिलांच्या डोळ्यांत अंजनच घातले. ‘वुमेन समिट’मध्ये दिवसभर गप्पा मारता? काम कधी करता? असा निरागस प्रश्नही त्यांनी विचारला. ‘छातीचं आॅपरेशन झाल्यावरही विहिरीत उतरून पहारीने खोदाई केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘डिश’ भरून खाऊनही पोट भरत नाही, भाजी-भाकरी आपली बरी, असे सांगत त्यांनी एखाद्या ‘डायटेशियन’च्या टिप्सच महिलांना दिल्या.
-------------
बाहेर गेले आणि माणसं आली की उठावे लागे़ घरची परिस्थिती नव्हती़ तेव्हा मंगळसूत्र विकलं़ शौचालय बांधलं़ गावातील घरोघरी जाऊन शौचालय बांधण्याचा बायकांना आग्रह केला़ आता संपूर्ण गाव हगणदारीमुक्त झालं आहे़ घरात केवळ शौचालय असणे महत्त्वाचे नाही; ते वापरणंही महत्त्वाचं आहे़  - सुवर्णा आटोळे
-------------
लोकमतच्या फिचर एडीटर अपर्णा वेलणकर या महिलांच्या जिद्दीची कहानी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘अडखळत बोलत असलेल्या या महिलांनी त्यांच्या परिसरात क्रांती केली आहे. नवीन चळवळीला त्यांच्या कामातून सुरू झाली आहे.’

Web Title: Harmony of rural Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.