कृषी, सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला; पांडुरंग फुंडकर यांना सर्वपक्षीय आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:42 AM2018-06-08T01:42:44+5:302018-06-08T01:42:44+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते.
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार व दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात त्यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुंडकर यांच्या संसदीय कार्याविषयी ग्रंथ निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांप्रती प्रचंड कणव
असलेले भाऊसाहेब हे एका पिढीला दुसºया पिढीशी जोडणारे व्यक्तिमत्व होते. मंत्रीमंडळांतील ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याकडे प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक अनुभव होता. जमीनीशी जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. राज्याचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केल्याने कृषी उत्पादनात गुणात्मक मोठी वाढ झाली. पक्ष संघटना पातळीवर, विचार परिवारातील सर्व कार्यकर्ते, संघटनांना भाऊसाहेबांचा हक्काचा आधार होता. त्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणात मोठे झालो. विधान मंडळातील त्यांचे कर्तृत्व लोकांसमोर येण्यासाठी राष्टÑकुल संसदीय मंडळातर्फे ग्रंथ निर्माण करण्यात यावा, त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यावेळी म्हणाले, की शेतकरी वर्गाच्या समस्या ते सातत्याने मांडायचे. विदर्भात सहकार क्षेत्रात त्यांनी काम केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही मनोगत केले. ते म्हणाले, की शेतकºयांच्या प्रश्नांची ते अत्यंत पोटतिडकीने मांडणी करीत असत. त्यांच्या प्रश्नाबाबत जागृत होते.
त्यांचे काम नेहमीच स्मरणात राहील. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल,
विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील,परिवहन
मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा
प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब दानवे, शेकापचे आमदार जयंत पाटील, मनसेचे बाळा नांदगावकर आदींनी भावना व्यक्त केल्या. यावेळी भाऊसाहेबाचे जीवनपट उलगडून दाखविणारी ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली.