पोलीस मारहाणप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधवांना 2 वर्षांची शिक्षा
By Admin | Published: January 6, 2017 02:53 PM2017-01-06T14:53:56+5:302017-01-06T14:58:42+5:30
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 6 - शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दोन गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी 1 वर्षाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
5 जानेवारी 2011 मध्ये मनसे पक्षाचे आमदार असताना हर्षवर्धन जाधव आणि पोलीस यांच्यात राडा झाला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा जाधव यांनी केला होता. अजिंठा वेरुळच्या दौ-यावर असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत मिळण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न जाधव करत होते.
यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला. यादरम्यान, पोलिसांवर हात उगारल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांवर आहे. खाकी वर्दीवर हात उगारल्याने संतापलेल्या पोलिसांनी हर्षवर्धन यांना चोप दिला. यात हर्षवर्धन गंभीर जखमीदेखील झाले होते.
हर्षवर्धन जाधव यांच्यावर 40 गुन्हे
दरम्यान 2014 मध्ये नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनाही हर्षवर्धन जाधव यांनी कानशिलात लगावली होती. येथील हॉटेल 'प्राइड'मध्ये उद्धव ठाकरे ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत होते. यावेळी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन जाधव करत होते. मात्र ‘यावेळी कोणालाही आता सोडायचे नाही’, असे पोलिसांना सांगण्यात आले.
मात्र हॉटेलमध्ये प्रवेश देण्यासाठी जाधव यांनी आरडा-ओरड केला. पण, पराग जाधव यांनी त्यांना आत सोडले नाही. तेव्हा आमदार जाधव यांनी पराग जाधव यांना कानशिलात लगावली आणि तेथून निघून गेले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.