हर्षवर्धन जाधव यांच्यावर ४० गुन्हे
By admin | Published: December 19, 2014 12:53 AM2014-12-19T00:53:14+5:302014-12-19T00:53:14+5:30
विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षक पराग गुलाबराव जाधव यांना बुधवारी मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी १२ वेळा
चार ठाण्यात १२ तक्रारी : खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचेही कलम
नरेश डोंगरे - नागपूर
विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षक पराग गुलाबराव जाधव यांना बुधवारी मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी १२ वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना आ. जाधव यांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात आ. जाधव यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२ आणि ३२३ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आ. जाधव यांचा बुधवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत ठिकठिकाणी शोध घेतला. मात्र, जाधव पोलिसांना मिळाले नाही. त्यांना कोर्टाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबवली.
पराग जाधव ‘रिझर्व्ह’
आमदाराच्या रोषाला बळी पडल्यामुळे चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक पराग जाधव यांची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आज त्यांना रिझर्व्ह ठेवण्यात आले. त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न देता त्यांना औषधोपचार, पोलीस ठाण्यात बयान नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उपलब्ध झाले नाही.
पोलिसांचे मिशन जाधव
शहर पोलिसांच्या एका पथकाने आज दिवसभर आ. जाधव यांच्यावर कुठे आणि किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती मिळवली. त्याचा एक अहवाल पोलिसांनी तयार केला. या अहवालाची प्रत प्रस्तुत प्रतिनिधीने प्राप्त केली.
त्यानुसार, अ.क्र. (अपराध क्रमांक) ९२/०३ ला पोलीस स्टेशन पिशोर (औरंगाबाद) येथे कलम ३५३, ५०४ आणि ५०६ अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याच पोलीस ठाण्यात आ. जाधव यांच्याविरुद्ध नंतर वेगवेगळ्या अ.क्र.नुसार विविध कलमान्वये सातवेळा गुन्हे दाखल झाले. कन्नड (औरंगाबाद) पोलीस ठाण्यात अ.क्र. ४१/०५ अन्वये भादंविच्या कलम १७१ अन्वये गुन्हा दाखल आहे.
खुलताबाद (औरंगाबाद) ठाण्यात अ.क्र. २/११ अन्वये खुनाचा प्रयत्न, अपहरण, सरकारी कामात अडथळा, विनयभंग आणि धमकी देण्याच्या आरोपावरून आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हे (भादंवि कलम ३०७, ३६३, ३५३, ३५४, ५०६) दाखल केले. देवगाव रंगारी (औरंगाबाद) पोलीस ठाण्यातही आ. जाधव यांच्याविरुद्ध अ.क्र. ०४/०९ नुसार कलम ३५३, १४७, ४२७ भादंवि अन्वये गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)