हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरी

By Admin | Published: January 7, 2017 05:08 AM2017-01-07T05:08:17+5:302017-01-07T05:08:17+5:30

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Harshavardhan Jadhav got the honor | हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरी

हर्षवर्धन जाधव यांना सक्तमजुरी

googlenewsNext


औरंगाबाद : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्यात पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कन्नड येथील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी एक वर्षाची सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
५ जानेवारी २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरूळला शासकीय बैठकीनिमित्त दौरा होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा वेरूळहून एमटीडीसीकडे जात असल्याने विरेगावचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी वाहतूक थांबविली होती. आमदार हर्षवर्धन जाधव (तेव्हा ते ‘मनसे’त होते) हे औरंगाबादहून फॉर्च्युनर गाडी स्वत: चालवीत आले. त्यांनाही पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी वाहन न थांबविता बंदोबस्तावरील पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पोलीस बाजूला झाले व जाधव हे न थांबता वेरूळकडे निघून गेले.
पोलीस निरीक्षक कोकणे यांनी वायरलेसवरून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी महावीर स्तंभाजवळ जाधव यांची गाडी थांबविली. पाठोपाठ कोकणेसुद्धा तेथे गेले. त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकणे यांना मारहाण केली. या वेळी महिला पोलीस कर्मचारी कांचन शेळके आणि शहनाज शेख यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
यासंदर्भात कोकणे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आमदार जाधव यांच्यासह मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आणि वाहनचालक संतोष सूर्यभान जाधव यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०७, ३५३, ३३२, ३३३, ३५४, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास खुलताबादचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने जाधव यांना भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ खाली प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. जाधव यांची इतर कलमांखाली निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच दिलीप बनकर आणि संतोष जाधव यांचीसुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)
...तर समाजात वेगळा संदेश जाईल
न्यायालयाने जाधव यांना शिक्षा घोषित करताच त्यांनी न्यायालयास विनंती केली की, वरील घटनेनंतर जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. ते विद्यमान आमदार असून, लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. त्यांना ‘प्रोबेशन आॅफ आॅफेंडर्स अ‍ॅक्ट’चा लाभ देत चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली.
मात्र, सध्या शासकीय कर्मचाऱ्यांवर होत असलेले हल्ले आणि लोकप्रतिनिधींची ‘अशी’ वर्तणूक या पार्श्वभूमीवर जाधव यांना वरील लाभ दिला तर समाजात वेगळा संदेश जाईल, असे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने जाधव यांची विनंती अमान्य केली.
>दंड भरून शिक्षेला तात्पुरती स्थगिती
न्यायालयाने निकाल घोषित केल्यानंतर जाधव यांनी दंडाची रक्कम तत्काळ न्यायालयात जमा करून वरील आदेशाविरुद्ध अपील दाखल करेपर्यंत (३० दिवसांपर्यंत) शिक्षेला स्थगिती देण्याची
विनंती केली असता न्यायालयाने
ती मंजूर केली.

Web Title: Harshavardhan Jadhav got the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.