विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:37 AM2019-09-27T11:37:01+5:302019-09-27T12:20:43+5:30
सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार मैदानात उतरविणार असल्याचा निर्णय शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे प्रमुख व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच जाहीर केला होता. पुन्हा युतीचे सरकार येऊ शकते. त्यामुळे आपण राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे टाळले असून, विरोधीपक्षातील आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही. तर मनसेत असताना मी हे स्व:ता अनुभवलं असल्याचा दावा जाधव यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केला.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जाधव यांनी २ लाख ८३ हजार मते घेतली. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र जाधव हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर असताना सुद्धा कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून निर्णय घेतला असल्याचे जाधव म्हणाले होते.
तसेच कोणत्याही पक्षासोबत न जाता, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णय का घेतला याचा खुलासा जाधव यांनी गुरुवारी कन्नड येथे घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमुळे भाजप-शिवसेनेच्या बाजूची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरीही भविष्यात युतीत बिघाडी निर्माण होणार असून, अशावेळी दोन्ही पक्षाचे नेते काही अपक्ष आमदार हाताशी लागतात का? याचा शोध घेतील. त्यामुळे अशा वेळी अपक्ष आमदार त्यांच्या बरोबर गेला तर मंत्रिमंडळात त्याची शंभर टक्के वर्णी लागणार.
तर विरोधीपक्षात असताना कुठलेही मदत नाही,कुठलेही बजेट नाही,निधी मिळत नाही. एवढचं नाही तर पोलिसांचा मारहाण करेपर्यंत त्रास मी सहन केला आहे. सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. विरोधीपक्षात असलेल्या आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही ही परिस्थिती असून, मी स्व:ता मनसेत असताना हे अनुभवलं असल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांशी माझे संबध चांगले असायला पाहिजे, यासाठी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.