हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:30 PM2024-10-04T12:30:27+5:302024-10-04T12:32:27+5:30

राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांना केले. 

Harshvardhan Patil from Indapur announced left BJP; He will join Sharad Pawar NCP | हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा

हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा

इंदापूर - गेली ६ दशकापासून पवार कुटुंबाचे आणि आमचे संबंध खूप चांगले आहेत. परंतु आज निर्णय करताना आम्ही जी भूमिका घेतो, ती जनतेची भूमिका असते. त्यामुळे आम्ही आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांशीही चर्चा झाली त्यांना माझ्या निर्णयाची कल्पना दिली. शरद पवारांच्या चर्चेनंतर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतोय असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. 

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात समर्थकांचा जाहीर मेळावा घेतला. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,  गेली २ महिने मी तालुक्यातील गावागावांचा दौरा करतोय. नेमका निर्णय काय घ्यायचा यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दीड दोन तास राजकीय भूमिकेबद्दल चर्चा झाली. त्यांनी माझ्यासमोर काही प्रस्ताव ठेवले, मी माझी भूमिका मांडली. शेवटी निवडणूक लढवायची असेल तर ही जागा महायुतीतील विद्यमान सदस्य असतील ते लढवणार असं त्यांनी सांगितला. दुसरा पर्याय दिला तो व्यक्तिश: मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना स्वीकारणे योग्य वाटला नाही. राजकारणात आणि समाजकारणात व्यक्तिगत प्रश्नापेक्षा आपल्यामागील जनतेचं हित महत्त्वाचं असते. मी गुरुवारी सिल्व्हर ओकला शरद पवारांना भेटायला गेलो. तिथे दीड तास सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. फोनवरून जयंत पाटीलही होते. तुम्ही आमच्या पक्षात यावं असा आग्रह पवारांनी धरला अशी माहिती त्यांनी दिली. 

त्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जावं होता. त्यामुळे मी आणि आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यात जाण्याचा निर्णय जाहीर केला. हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. मी भाजपाचे जे प्रमुख नेते आहेत, त्यांच्यासोबत ५ वर्ष काम केले. त्यात रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील तसेच इतर सहकाऱ्यांशीही चर्चा केली. त्या सगळ्यांनाही माझ्या निर्णयाची कल्पना दिली आहे. इंदापूर तालुक्यात लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. गेली १० वर्ष या तालुक्यात जी माणसं आमच्यामागे ठामपणे उभी राहिली त्यांच्यावर खूप अन्याय झाला. त्यामुळे हा जनतेचा उद्रेक याठिकाणी निर्माण झाला आहे असा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

दरम्यान, राजकारणात कोण कोणाचं शत्रू नसतो. प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध असतात. आज मी हा निर्णय घेतला म्हणून इतरांशी संबंध दुरावले असं होत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. संस्कृती जपण्याचे काम करतोय. भाजपा तालुकाध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष, माझ्यासहित भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करतो. आपल्याला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही, आपल्याला भविष्यातील विजय मिळवायचा आहे. सगळ्या गोष्टी संयमाने घ्या, आपण ६० वर्ष विजयही बघितला आहे, १० वर्षाचा पराजयही बघितला आहे. पवार कुटुंबाचे आणि आपले व्यक्तिगत संबंध आहेत. गेल्या ६ दशकापासून संबंध आहे. राजकारणात वेगळे निर्णय झाले असतील परंतु व्यक्तिगत संबंधात कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. कुणालाही काही बोलू नका, जे व्हायचं ते व्यवस्थित होईल. मागील १० वर्षात जो त्रास झाला आहे तो दुरुस्त करायचा असेल तर इथला प्रत्येकजण उद्याच्या परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. 

राजकीय वनवास संपुष्टात येणार

गेल्या महिना-दोन महिने सर्वांनी भावना व्यक्त केल्या, मी पदाला हापापलेला माणूस नाही. राजकारणात पुढे काय घडणार याची चिंता करण्याची गरज नाही. इंदापूर तालुक्याचा राजकीय वनवास संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. नव्या पर्वाची सुरुवात करणार आहोत. जो काही निर्णय जाहीर करायचा असतो, त्यांच्या पक्षात प्रवेश करताना तारीख आणि पुढची भूमिका काय असणार हे ते ठरवतील. आपल्या सगळ्या मनाप्रमाणे भूमिका स्पष्ट करतो. उद्या काहीही झाले तर दोन वेळच्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता तिसऱ्यांदा लढाईची वेळ आल्यानंतर कुठेही कमी पडता कामा नये एवढी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पाटील कुटुंब आपलं आहे. इंदापूर तालुका एकच कुटुंब आहे असं समजून वाटचाल करूया असं आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. 
 

Web Title: Harshvardhan Patil from Indapur announced left BJP; He will join Sharad Pawar NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.