हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:37 PM2024-10-07T12:37:59+5:302024-10-07T13:08:55+5:30

हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

Harshvardhan Patil Joined Sharad Pawar faction Devendra Fadnavis replayed | हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."

हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."

BJP Harshavardhan Patil Joined Sharad Pawar Group : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना पक्ष प्रवेश दिला. या पक्ष प्रवेशाविषयी बोलताना हा जनतेचा उठाव आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी लोकाग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशावर आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. त्या आधीपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमधून पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झालं होतं. त्यानंतर सोमवारी इंदापूर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दात भाष्य केलं.

नागपुरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही नवीन काय सांगताय, ही तर जुनी न्यूज आहे, ही आजची न्यूज थोडी आहे, असं उत्तर दिलं. त्याआधी देवेंद्र फडणवीसांनी शक्य ती मदत केली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं  होतं. "इंदापूरमधील कार्यकर्ते अस्वस्थ झाले, जनतेनं उठाव झाला आणि त्यांनी तुतारी हातात घेण्यास सांगितलं. राजकारणात असं पहिल्यांदा घडत असून लोकशाहीत लोकांच्या मतांचा आदर करावा लागतो," असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले होते.

हर्षवर्धन पाटील आमच्याकडे येणे शुभशकून - संजय राऊत

हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी हा शुभशकून असल्याचे म्हटलं. "हर्षवर्धन पाटील यांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभशकून आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या रुपाने एक सुरुवात आहे.  आता कळेल कोण कुठे आहे आणि कोण कुठं जातात. ज्या दिवशी महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल त्यादिवशी महाविकास आघाडीत येण्याचा प्रवाह आणि ओघ वाढेल,"  अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Web Title: Harshvardhan Patil Joined Sharad Pawar faction Devendra Fadnavis replayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.