‘टोळी’वर उतारा ‘हार्वेस्टर’चा !
By Admin | Published: December 6, 2015 02:29 AM2015-12-06T02:29:37+5:302015-12-06T02:29:37+5:30
ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.
- शेषराव वायाळ, परतूर (जि.जालना)
ऊसतोडणीसाठी लागणाऱ्या टोळीवर उतारा म्हणून आता ‘हार्वेस्टर’चा वापर वाढला आहे. ऊसतोडणीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न त्यामुळे काही प्रमाणात सुटला आहे.
शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी एकमेव मार्ग असतो, ऊसतोड कामगारांचा. एका टोळीत १० कामगार असतात. ऊसतोडीला एका टोळीसाठी ५ ते ६ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र टोळ्या मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. टोळी मिळाल्यानंतर शेतकरी मोकळा श्वास घेतो. ऊसतोड टोळ्या साखर कारखान्याकडून पैशांची उचल घेतात.
त्यात मध्यस्थी म्हणून पुन्हा एक मुकादम असतो. कारखाना सुरू होण्याच्या काळात टोळ्यांची जुळवाजुळव करून मुकादम कारखान्याच्या ताब्यात देतो. टोळ्यांची खाण्याची, राहण्याची व्यवस्था करायची. त्यात पुन्हा टोळ्या पळून जाणे, शेतकऱ्यांच्या चढाओढीतून त्यांची पळवापळवी, ऊसमालकाने पुन्हा रोख पैसे
किंंवा उसाचे वाढे टोळीलाच देणे असे अनेक प्रश्न सोडवावे लागतात.
साखर कारखान्याचे प्रश्न, राजकारण आदी अडचणींमुळे ऊसलागवड म्हणजे बरेचदा डोकेदुखी होते. टोळी प्रश्नावर ऊसउत्पादकांना ‘हार्वेस्टर’ हे एक प्रकारे वरदान ठरले आहे.
त्यामुळे ऊसतोडणीची समस्या बऱ्याच प्रमाणात सुलभ झाली आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर होणारी शेतकऱ्यांची धावपळ त्यामुळे थांबली आहे. आपला संपूर्ण ऊस कारखान्यावर वेळेवर जाणार, याची खात्री शेतकऱ्यांना या यंत्रामुळे वाटू लागली आहे.
दिवसाला ५० टन तोड
एक हार्वेस्टर दिवसात ५० ते ५५ टन ऊस तोडतो. एक टोळी दिवसाला ११ ते १२ टन ऊस तोडते. हार्वेस्टरने काढलेल्या उसाचे पाचट जाळण्याची गरज नसते. त्याचे खत होते.
हार्वेस्टरमुळे टोळ्यांचे काम ५० टक्क्यांवर आले आहे. कारखान्याला ३०० टोळ्या लागायच्या. परंतु सध्या कारखान्याकडे १३४ टोळ्या आहेत. हार्वेस्टर यंत्रामुळे शेतकऱ्यांची व कारखान्याची अडचण दूर झाली आहे.
- शिवाजीराव जाधव, चेअरमन, बागेश्वरी साखर कारखाना