हरियाणाचे पाच पोलीस निलंबित
By admin | Published: June 5, 2016 01:16 AM2016-06-05T01:16:15+5:302016-06-05T01:16:15+5:30
हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणी कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या हरियाणाच्या गुरगांव पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. २८ मे रोजी यातील पाच
मुंबई : हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणी कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या हरियाणाच्या गुरगांव पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली. २८ मे रोजी यातील पाच पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच कोर्टाने या पोलिसांना अटक करण्याबाबत हिरवा कंदील दाखविल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. भूमिगत झालेल्या गुडगाव पोलिसांना शरण येण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मुंबई एअरपोर्टवर ७ फेब्रुवारी रोजी हरियाणातील गुरगाव पोलिसांच्या पथकाने संदीप गडौली याचा एन्काउंटर केला होता. गडौली एन्काउंटरबाबत हरियाणा पोलिसांकडून म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने, त्यांचा ताबा घेऊनच त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर, यातील सत्य बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. संदीप गडौली एन्काउंटर प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने, या प्रकरणी अनेकदा हरियाणा पोलिसांच्या गुरगांव काइम ब्रँचच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, त्यांनी मुंबई पोलिसांना कोणत्याही प्रकारे सहकार्य न करता, हजेरी लावली नाही. याउलट गडौलीच्या कुटुंबीयांनी हरियाणा पोलिसांच्या एन्काउंटर विरोधात न्यायालयात दाद मागितली असता, याचा एसआयटीने तपास करण्यास सुरुवात केली होती. या वेळी गडौलीच्या वतीने कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचा उल्लेख अहवालात एसआयटीने करून अहवाल सादर केला होता.
बॅलेस्टिक रिपोर्टमध्येदेखील सर्व काडतुसे ही पोलिसांच्या शस्त्रामधून फायर झाल्याचे नमूद करण्यात आल्याने, गडौली एन्काउंटर हा पूर्णत: बनावट असल्याचे शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर, न्यायालयाने हरियाणा पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरगांव काइम ब्रँचने गडौलीविरोधात दाखल केलेला गुन्ह्यातील ३०७ कलम (हत्येचा प्रयत्न) काढून, मुंबई पोलिसांनी ३०२ आणि १२० बी (हत्या आणि काइम कॉन्ट्रव्हर्सी) हे कलम हरियाणा पोलिसांविरोधात दाखल केले आहे.
मुंबई पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या गुडगाव पोलिसांच्या अटक वारंटच्या अर्जाबाबत न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. मात्र, याच प्रकरणातील दोषी पोलिसांवर २८ मे रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना शरण येण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)
दिव्या अहुजा गुन्हे शाखेच्या ट्रॅकवर
- गुडगावमध्ये गुन्हेशाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडौलीची गलफ्रेंड असलेली मॉडेल दिव्या अहुजा मिसिंग असल्याचे वृत्त पसरत होते. याबाबत मिसिंग तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, ती सुरुवातीला गोवा येथे काही दिवस होती. त्यानंतर, ती सध्या कोठे आहे किंवा काय करत आहे, याबाबत गुन्हे शाखा गेल्या आठवड्यापर्यंत तिच्यावर वॉच ठेऊन असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.