जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:57 AM2024-03-01T10:57:40+5:302024-03-01T11:00:59+5:30

मराठा नेत्यांनी भानावर या. मी घाबरत नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. फक्त मला साथ द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

Has party become bigger than caste?; Manoj Jarange Patil was angry on Maratha leaders | जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

जातीपेक्षा पक्ष मोठा झाला का?; मनोज जरांगे पाटील मराठा नेत्यांवर संतापले

छत्रपती संभाजीनगर - मराठा समाजाचे सर्वपक्षीय जे आमदार, मंत्री आहेत त्यांनी सगेसोयरे यांच्याबाबत अधिवेशनात बोला सांगितले. पण एकही मराठा नेता बोलला नाही. हे मोठे षडयंत्र आहे. सर्व मराठा या आरक्षणाचा फायदा घेणार आहे. १० टक्के आरक्षण दिलंय ते ५० टक्क्यांच्या आत द्या. मराठा समाज मागास आहे हे सिद्ध झालंय मग ओबीसीतून आरक्षण का देत नाही. मराठा समाजानं एकजूट राहावे. माझ्याविरोधात टोळी उभी केलीय. उलट्या बुद्धीची लोक मला अटक करा म्हणतायेत. जातीपेक्षा तुम्हाला पक्ष मोठा झाला का? अशी संतप्त भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात जाणुनबुजून जे षडयंत्र सुरू आहे त्याकडे मराठा समाज शांत बघून पाहत आहे. सत्तेचा गैरवापर करून एसआयटी लावली जातेय. हजारो कोट्यवधी घोटाळे करणारे आसपास फिरायला लागलेत. त्यांच्यावर चौकशी लावत नाही. मात्र मी गोरगरिब मराठ्यांचा लढा लढतोय म्हणून माझी चौकशी करतायेत. काहीही झाले, मला जेलला टाकले तरी मी मागे हटत नाही. मी नेत्याला बोललो म्हणून काहींना झोंबलंय. काही आमदार असे तुटून पडलेत जसं पूर्वीचा राग आहे. तुमची माया गोरगरिब मराठ्यांसोबत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगेसोयरे यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे करावे. मराठ्यांवर चाल करून येऊ नका. मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय. तुमच्या पक्षाला आणि नेत्याला बोललो. तुम्ही गोरगरिब मराठ्यांची पोरं मारायची आहेत का?. माझी काही चौकशी करायची ती करा. मराठा समाजाचे आमदार, मंत्री यांनी ७५ वर्षात मराठ्यांची लेकरं मोठी केली नाही. मला गुंतवलं तर आरक्षण लढा बंद होणार असं त्यांना वाटतं असंही जरांगे म्हणाले. 

दरम्यान, मराठे गप्प बसणार नाही. कालपासून बैठका सुरू झाल्यात. ताकदीने मराठा समाज बैठका घेतोय. मी बोलल्यावर राग कसा येतो? मराठा समाजाचे आमदार, मंत्री खूप मोठी चूक करताय. आंदोलनामुळेच कुणबी दाखले मिळाले, १० टक्के आरक्षणही यामुळेच मिळाले. मराठा नेत्यांनी भानावर या. मी घाबरत नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटत नाही. फक्त मला साथ द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

गावोगावी मराठा समाजाचे व्हॉट्सअप ग्रुप करा

कोण काय बोलतो, काय भाषण करतोय हे मराठा समाजाने शांततेने पाहावे. तालुकास्तरावर आणि गावस्तरावर मराठ्यांनी फक्त मराठा समाजाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आपल्याला एकमेकांची माहिती हवी. विनाकारण अफवा पसरवली जाते. सध्या काहीच नाही. देवेंद्र फडणवीसांनी अंतरवालीतील दडपशाही कमी केली. अफवा पसरवल्या जातात त्यामुळे महाराष्ट्रभर ग्रुप तयार झाले पाहिजेत. ज्यादिवशी माझ्यावर काही संकट येईल तेव्हा माझ्या मराठा समाजासह सर्व जातीचे लोक रस्त्यावर येतील याची मला खात्री आहे असंही जरांगे यांनी मराठा समाजाला सांगितले. 

गृहमंत्री असा नसावा

देवेंद्र फडणवीस मराठ्यांची जिरवायला लागलेत. मराठा नेत्यांना हाताशी धरलं आहे. मराठा समाजाने शांतपणे हे बघावे, अंतरवाली सराटीत संचारबंदी का लावली? एवढी दडपशाही केली जातेय. गृहमंत्री असा नसावा, जनतेवर दडपशाही करून स्वत:ची गुंडगिरी लावावी. मराठा समाजाविषयी फडणवीसांच्या मनात खुन्नस आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला पद जनतेच्या रक्षणासाठी दिलंय, संचारबंदी करून गुंडगिरी करण्यासाठी दिले नाही. मोदी-शाह यांनी समजवावं असंही जरांगे पाटील म्हणाले. 

Web Title: Has party become bigger than caste?; Manoj Jarange Patil was angry on Maratha leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.