मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा; कडूंचा दावा, ड्राफ्टही देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 01:07 PM2024-01-16T13:07:11+5:302024-01-16T13:20:19+5:30
जरांगे पाटलांनी समाजाचे भले होत असेल तर आंदोलन मागे घ्यावे असे कडू म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटलांनी सुरु केलेले आंदोलन आता मुंबईत जाऊन ठेपणार आहे. २० जानेवारीला जरांगे पाटील आणि मराठा समाजाचे लोक मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यापूर्वीच हा मोर्चा थांबविण्यासाठी राज्य सरकार धावपळ करत आहे. अशातच शिंदेंच्या गटातील आमदार बच्चू कडू यांनी सगेसोयऱ्यांवर तोडगा सापडल्याचा दावा केला आहे. तसेच हा ड्राफ्ट जरांगे पाटलांना दाखविणार असल्याचे म्हटले आहे.
जरांगे पाटलांनी समाजाचे भले होत असेल तर आंदोलन मागे घ्यावे असे कडू म्हणाले आहेत. काल मुख्यमंत्र्यांसोबत चार तास चर्चा केली. यानंतर आता मराठा आरक्षणाचा ड्राफ्ट घेऊन आम्ही विभागिय आयुक्तांकडे जात आहोत. तिथून आम्ही मनोज जरांगेंना तो ड्राफ्ट देऊ. जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. फक्त कुठे काना-मात्रा आदी राहिले असेल, असे कडू म्हणाले.
किरकोळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया, मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कॅम्प, ज्यांची नावे नोंदीत सापडलीत त्यांची मराठीत माहिती गावोगावी लावणे आदी गोष्टी मान्य करण्य़ात आल्या आहेत, असेही कडू म्हणाले. याचबरोबर ड्राफ्ट त्यांना वाचायला देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार असल्याचे कडू म्हणाले.