“छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले हवे होते पण...”; हसन मुश्रीफ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:03 PM2024-05-31T13:03:12+5:302024-05-31T13:05:34+5:30
Hasan Mushrif News: जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
Hasan Mushrif News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोडो फाडला. मात्र, चूक लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली. असे असले तरी विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल सुरूच ठेवला असून, छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली म्हणून हसन मुश्रीफ यांनी टीकास्त्र सोडले आहे.
विरोधकांनी सडकून टीका सुरू केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेण्यासाठी छगन भुजबळ पुढे सरसावले. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने महाडला गेले. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. त्यावेळी त्यांनी न बघताच ते चित्र फाडले. आव्हाडांनंतर त्यांचे अनुकरण इतरांनी केले. पण त्यांनी माफीही मागितली. मूळ मुद्दा जो आहे आम्हाला मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड असेच सुरू राहील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. मात्र, यावरून हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत भुजबळांवर निशाणा साधला.
छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते
छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांवर टीका केली. त्यामुळे आता हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडले हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे विधान छगन भुजबळ यांनी केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवे होते, या शब्दांत हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांना विरोधासाठी विरोध करु नका. मुख्य मुद्दा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश होता कामा नये हा आहे. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको हे सांगा. नंतर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करा. आव्हाड विरोधक आहेत त्यांचा विरोध निश्चितच करा, आमचे काही म्हणणे नाही. मुंबईतून ते चवदार तळ्यावर गेले होते त्यांच्याहातून चुकून झाले. आता त्यांना शिक्षा काय करायची ती करा माझं काही म्हणणे नाही. मी समता परिषदेचा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. मी अशा गोष्टींमध्ये स्पष्ट बोलतो. खोटे बोलणे मला जमत नाही. विरोधासाठी विरोध मी करु शकत नाही, असे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.