बहिणीसोबतचे दुष्कृत्य लपवण्यास हसनैनने केल्या हत्या

By admin | Published: March 6, 2016 04:04 AM2016-03-06T04:04:58+5:302016-03-06T04:04:58+5:30

गतिमंद बहिणीसोबत करीत असलेल्या शारीरिक आणि लैंगिक शोषणाचे दुष्कृत्य लपविण्यासाठीच हसनैन वरेकर याने फालुद्यातून गुंगीचे औषध देऊन कुटुंबातील १४ जणांची सामूहिक हत्या केल्याचे उघड झाले आहे.

Hasnain kills the murderer to hide his sister's sinning | बहिणीसोबतचे दुष्कृत्य लपवण्यास हसनैनने केल्या हत्या

बहिणीसोबतचे दुष्कृत्य लपवण्यास हसनैनने केल्या हत्या

Next

ठाणे : येथील घोडबंदर रोडवरच्या वडवलीतील आपल्या कुटुंबातील १४ जणांची सामूहिक हत्या हसनैन वरेकर यानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्यावर असलेले ६८ ते ७० लाखांचे कर्ज आणि गतिमंद बहिणीसोबत करीत असलेल्या शारीरिक आणि लैंगिक शोषणाचे दृष्कृत्य लपविण्यासाठीच त्याने फालुद्यातून गुंगीचे औषध देऊन हे भीषण कृत्य केल्याचे या हत्याकांडातून बचावलेली त्याची बहीण सुबिया हिच्या जबानीतून उघड झाल्याची माहिती सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
> फालुद्यातून गुंगीचे औषध देऊन केल्या हत्या
गतिमंद बहिणीसोबत करीत असलेल्या शारीरिक आणि लैंगिक शोषणाचे दुष्कृत्य लपविण्यासाठीच हसनैन वरेकर याने फालुद्यातून गुंगीचे औषध देऊन कुटुंबातील १४ जणांची सामूहिक हत्या केल्याचे उघड झाले आहे. या भीषण हत्याकांडातून बचावलेली त्याची बहीण सुबिया हिच्या जबानीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. सुमारे ७० लाखांचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता त्यातच या दुष्कृत्याची माहिती आई आणि इतर बहिणींना समजल्याने मानसिकदृष्ट्या खचून त्याने हे कृत्य केल्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी रात्र ते शनिवारी पहाटेपर्यंत चाललेल्या ९ तासांच्या जबानीत सुबियाने वरेकर कुटुंबातील अनेक घटना सांगून हे हत्याकांड कसे घडले, प्रत्यक्ष हत्याकांडाच्या वेळी काय काय झाले, याची इत्थंभूत माहिती दिली आहे.
हसनैन ज्या वेळी गुंगीत असणाऱ्या घरातील एकेका सदस्याची हत्या करीत होता, त्या वेळी शुद्धीवर आलेल्या त्याच्या आईने मै तुम्हारी माँ हू, मैने तुझे जनम दिया है, मुझे छोड दे... अशी हातापाया पडून विनवणी केली. मात्र, मै तुझे भी तडपा तडपा कर मार डालूंगा, सबको मार कर मंै भी मर जाऊगां! असे तो बडबडत असल्याचे सुबियाने आपल्या जबानीत म्हटले आहे. त्या दिवशी दावतला येणे शक्य नसल्याचे आपण हसनैनला सांगितले होते. त्यामुळे तो दोन दिवस फोन करून येण्याची वारंवार विनंती करीत होता. त्यानंतर, तो रिक्षा घेऊन घरी आला. घरच्यांना विनंती केल्यावर त्यांच्या सांगण्यावरून आपण येण्यास तयार झालो. इतर बहिणींबाबत त्याला विचारणा केली. त्यासुद्धा येणार असल्याचे त्याने सांगितले.
दावतसाठी काही तरी घेण्याचे सांगताच काही घेण्याची गरज नाही, सर्व घेतल्याचे त्याने काळ्या पिशव्या दाखवून तिचा विश्वास संपादन केला. साधारणत: रात्री १ ते १.२५ च्या दरम्यान खेळीमेळीत जेवणखाणे सुरू होते. नेहमी २ ते २.२५ दरम्यान चालणारी दावत त्या दिवशी लवकरच झाल्याने सर्व जण लवकर झोपी गेले. मात्र, नंतर काही वेळातच आई-बहिणीचा आवाज ऐकून सुबियाला जाग आली. तेव्हा, तिने त्या रूमच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी आई विनवणी करीत होती. मला पाहून तो दरवाजाकडे धाव घेत असताना वार केला. मी कशीबशी दुसऱ्या रूममध्ये गेले. त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, खिडकीत येऊन मुलीला मारण्याची धमकी दिली. पण, गोंगाट वाढल्याने तो पुन्हा आत
गेला. त्यानंतर, काही नातेवाइकांनी बाहेर काढल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
> हसनैनने २०१३मध्ये नोकरी सोडल्यानंतर आजोबांकडून ५ लाख, आईकडून १० लाख आणि दोन मावशांकडून १०-१० लाख तसेच काही बँकांकडून असे जवळपास ७० लाखांचे कर्ज घेतले होते. ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते.
हसनैन संशयी होता
हसनैनची घरात दहशत होती. तसेच तो संशयी स्वभावाचा होता. त्यातून तो कधी गमतीने तर कधी गंभीरपणे सुरा आमच्या गळ्यावर लावत होता, असे तिने सांगितले आहे. हत्याकांडासाठी वापरलेला सुरा हा वडवली गावात फेमस होता. तो सुरा त्याने त्याच्या लग्नापूर्वी घेतला होता. तसेच कुर्बानीसाठी या सुऱ्याचा गावातील लोक वापर करत.
> गावात दुर्गंधी
वडवली गावात घडलेल्या हत्याकांडामुळे वरेकरांच्या घरात रक्ताचा सडा पडला होता. त्याच स्थितीत घर असल्याने आता घरातून दुर्गंधी येऊ लागली आहे. त्या दुर्गंधीपासून सुटका करण्याची मागणी शेजाऱ्यांनी केली.
> माजिवड्यात वन बीएचके फ्लॅट एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ दरम्यान भाड्याने घेतला होता. त्याचे प्रतिमहा भाडेही मोजले होते. तेथे टीव्ही आणि संगणक होता. त्याच्याव्यतिरिक्त तेथे कोणी जात नसे. तो फ्लॅट कशासाठी घेतला, याबाबत प्रश्नच असल्याचे तिने म्हटले.
> हसनैन गंदी हरकते करता था!
सुबिया ६ जानेवारीला मुलीला पोलिओ डोस देण्यासाठी आली असताना तिची मतिमंद बहीण बैतुल हिने हसनैन गंदी हरकत करता था असे सांगितले होते. याबाबत तिने ६ फेब्रुवारीला एका कार्यक्रमावेळी आई आणि बहिणींना सर्व सांगितले. ही हकिकत सुबिया सांगताना हसनैन हा पडद्यामागे उभा राहून ऐकत होता. याचदरम्यान, पडदा सरकल्याने आम्हाला पाहताच त्याचा चेहरा पडला. पण, त्याने तो कसाबसा सावरला होता. यामुळे आईने हसनैनला मारले होते. बैतुलला एकटे सोडून ती कुठेही जात नव्हती तसेच बैतुल आईसोबतच झोपत होती.
> अहवाल मंगळवारी
फ ॉरेन्सिक अहवालासह हसनैनच्या घेतलेल्या विविध नमुन्यांच्या अहवालाची पोलीस वाट पाहत आहेत. सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे अखेर मंगळवारपर्यंत त्या अहवालाची वाट पाहावी लागणार आहे.
मेहुण्यांचीही चौकशी
बैतुलबाबत सुरू असलेल्या हसनैनच्या लैंगिक शोषणाबाबत त्याच्या मेहुण्यांना माहिती होती का, याबाबतही त्यांना बोलावून चौकशी केली जाणार आहे.
> ‘त्या’ कोंबड्याची अखेर झाली सुटका
हसनैनच्या तावडीतून कुर्बानीसाठी आणलेला एक कोंबडा आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. हत्याकांडानंतर पहाटेपासूनच गडबड सुरू असल्याने घरातील कोंबड्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे घरातून कोंबड्याची बांग शेजाऱ्यांना ऐकू आली. तेव्हा, घरात कोंबडा असल्याचे समोर आले. दोन दिवस अन्न व पाण्याशिवाय राहिलेल्या त्या कोंबड्याची पोलिसांनी सुटका केली.

Web Title: Hasnain kills the murderer to hide his sister's sinning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.