घृणास्पद..! मायलेकीची विवस्त्र करून घेतली झडती
By admin | Published: February 23, 2016 03:35 AM2016-02-23T03:35:55+5:302016-02-23T03:35:55+5:30
चोरीच्या संशयातून दलित समाजातील मायलेकींना भर रस्त्यावर सुमारे दोनशे लोकांसमोर विवस्त्र करून त्यांची झडती घेण्याचा घृणास्पद प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला.
इंदापूर (जि. पुणे) : चोरीच्या संशयातून दलित समाजातील मायलेकींना भर रस्त्यावर सुमारे दोनशे लोकांसमोर विवस्त्र करून त्यांची झडती घेण्याचा घृणास्पद प्रकार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित महिला फरारी असल्याची माहिती इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी दिली.
आरोपी श्रीरंग दादू शेंडगे (वय ६१ वर्षे) याला सोमवारी पहाटे ५च्या सुमारास अटक करण्यात आली. मुख्य संशयित महिला चतुराबाई श्रीरंग शेंडगे (वय ५५ वर्षे, दोघे रा. कचरेवाडी, ता. इंदापूर) ही फरारी आहे.
अंथुर्णे येथील महिलेने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडित मायलेकी आठवडे बाजारात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करतात. रविवारी इंदापूरच्या आठवडे बाजारात भाजीविक्री करून त्या दोघी सहा आसनी रिक्षातून घरी निघाल्या होत्या.
या रिक्षात बसलेल्या महिलेच्या हातातील छत्री मुलीला लागत असल्याने दोघी त्यातून उतरून दुसऱ्या रिक्षामध्ये बसून निमगाव केतकीच्या दिशेने निघाल्या. इंदापूर - बारामती रस्त्यावरील वरकुडे खुर्द गावाजवळ पहिल्या रिक्षाने त्या दोघी बसलेल्या रिक्षाला थांबविले. चतुराबाई हिने मुलीला खाली ओढून ‘माझ्या गळ्यातील डाग चोरला आहे’ असा आरोप केला. दरम्यान फोन करून तिने कचरेवाडी आणि परिसरातील परिचितांना बोलावून घेतले. जातीवाचक शिवीगाळ सुरू केली. यावळी दीडशे ते दोनशे लोक जमा झाले. गर्दीतील एकाने दोघींना नग्न करा, असे म्हणत मारहाण सुरू केली. रस्त्यावरच मुलीच्या अंगावरील कपडे आणि या महिलेची साडी काढून झडती घेण्यात आली. जवळची पर्स आणि पिशवीही तपासली. मायलेकी पोलिसांकडे जाऊया, म्हणत असताना त्याकडे दुर्लक्ष केले. या दोघींकडे काहीही सापडले नाही, त्यामुळे ‘आपण प्रकरण मिटवून घेऊ’ असे चतुराबाईने म्हटल्यावर सर्वांनी पोबारा केला. त्यानंतर रात्री दोन वाजता याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले, ‘‘झडती घेण्याचा प्रकार घडला असला तरी या दोघींना विवस्त्र केले होते किंवा नाही हे पुढील तपासात निष्पन्न होईल. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तसा गुन्हा दाखल केला आहे.’’