दरवाढीला हवा ब्रेक

By admin | Published: June 26, 2014 01:01 AM2014-06-26T01:01:09+5:302014-06-26T01:01:09+5:30

रेल्वे दरवाढीविरोधात नागपूर रेल्वेस्थानकावर शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

Haul break | दरवाढीला हवा ब्रेक

दरवाढीला हवा ब्रेक

Next

काँग्रेसची निदर्शने : कार्यकर्त्यांनी गोडी रोखली
नागपूर : रेल्वे दरवाढीविरोधात नागपूर रेल्वेस्थानकावर शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
रेल्वे प्रवासभाड्याच्या विरोधात सायंकाळी आम आदमी पक्षानेही जयस्तंभ चौकात भाजपविरोधी नारेबाजी करून नागपूर रेल्वेस्थानकात हस्ताक्षर आंदोलन राबविले.
नागपूर शहर काँग्रेस कमिटीने रेल्वे दरवाढीविरोधात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. त्यांनी सुरुवातीला रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागातील मेनगेटजवळ घोषणाबाजी केली. त्यानंतर १२७२१ हैदराबाद-ह.निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानकात शिरले. ते इटारसी एण्डकडील दक्षिण एक्स्प्रेसच्या इंजिनपुढे उभे झाले.
काही पदाधिकारी हातात काँग्रेसचे बॅनर, झेंडे घेऊन इंजिनवर चढले, तर काही आंदोलनकर्ते पुढे जाऊन थेट रेल्वे रुळावर झोपले. भाजपविरोधी घोषणा, रेल्वे दरवाढ कमी करण्याच्या घोषणा यामुळे रेल्वेस्थानक परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून टाकला.
अचानक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या उग्र रूपामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. आंदोलनकर्त्यांनी रेल्वेमंत्री, भाजपा विरोधात घोषणाबाजी जवळपास ४० मिनिटे सुरू ठेवली. दक्षिण एक्स्प्रेस ९.५५ वाजता सुटणार होती. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही गाडी तब्बल ३० मिनिटे रोखून धरली. ‘आरपीएफ’, लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकांना तेथून बाजूला केले आणि त्यानंतर दक्षिण एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
आंदोलनात सहभागी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, नगरसेवक प्रशांत धवड, शौकत कुरेशी, अभिजित वंजारी यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे अ‍ॅक्ट १७४, १४७, १५६, १४५(सी)नुसार गुन्हे दाखल केले. आंदोलनात आभा पांडे, माजी आमदार अशोक धवड, नगरसेविका रेखा बाराहाते, निमिषा शिर्के, सरस्वती सलामे, रमेश राऊत, आशा राऊत, शुभांगी चिंतलवार, जगदीश टोटलवार, हेमराज वानखेडे, गजराज हटेवार, राजा द्रोणकर, विनोद सोनकर, दिलीप जैस्वाल, कमलेश समर्थ, राजी व्यास यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Haul break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.