एक कर्तव्य पार पाडले... तर दुसरे राहूनच गेले!
By admin | Published: February 23, 2017 04:40 AM2017-02-23T04:40:09+5:302017-02-23T04:40:09+5:30
मुंबई पोलीस दलातील तब्बल ६० ते ७० टक्के पोलिसांना बंदोबस्त, त्यात मतपत्रिका
मनीषा म्हात्रे / मुंबई
मतदानाच्या दिवशी मतदार यादीतून ११ लाख मतदारांचे नावच गायब झाल्याने राजकीय नेत्यांचा निवडणूक आयोगाकडे तक्रारीचा सूर वाढला. हा गोंधळ सुरू असताना, मुंबई पोलीस दलातील तब्बल ६० ते ७० टक्के पोलिसांना बंदोबस्त, त्यात मतपत्रिका न पोहोचल्यामुळे ‘मताधिकार’ हुकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे एक कर्तव्य पार पाडले, मात्र दुसरे राहून गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मुंबई पोलीस दलातील तब्बल ३५ हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरला होता. पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांसह केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शीघ्र कृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स फोर्स शहरात जागोजागी तैनात ठेवले होते.
मुंबई पोलीस दलात ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. बंदोबस्तामुळे काही अंशी पोलिसांनाच मतदानाचा हक्क बजावणे शक्य नसते. त्यात अनेक पोलिसांना सुरक्षेच्या कर्तव्याबरोबरच हे कर्तव्य पार पाडण्याची उत्सुकता असते. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांच्यासाठी मतपत्रिकेची सुविधा करण्यात येते. बंदोबस्तापासून जवळ असलेल्या मतदान केंद्रात संबंधित पोलिसांना मतपत्रिकेद्वारे मतदान करता येते. ते संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सोपवून पुढे पोस्टाद्वारे पाठविले जाते. यंदा मात्र या मतपत्रिका पोलिसांपर्यंत पोहोचल्या नाहीत.
यंदाच्या निवडणुकीसाठी जास्तीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही राखीव ठेवण्यात आले होते. अशात अंदाजे ६० ते ७० टक्के पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एका वरिष्ठ निरीक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सकाळपासूनच बंदोबस्ताची गडबड सुरू होती. माझा नाव कुर्ला येथील मतदारसंघात आहे. मी मतदानाच्या आदल्या दिवसापासून बंदोबस्ताच्या तयारीत होतो. त्यामुळे मतदानाच्या बंदोबस्तात स्वत:च्या मतदानासाठीच वेळ मिळाला नाही. शिवाय ज्या ठिकाणी बंदोबस्तासाठी होतो त्या ठिकाणी ती मतपत्रिका पोहोचली नाही, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर सायन पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा केली असता, मतदान करायचे होते. मात्र बंदोबस्तामुळे आपल्या मतदान केंद्रात मतदान करणे शक्य नव्हते. शिवाय संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकाही पोहोचली नाही, त्यामुळे ते राहून गेले. तसेच वरळीत राहणाऱ्या एका वरिष्ठ निरीक्षकानेही याबाबत खंत व्यक्त केली. बंदोबस्तामुळे आपल्याला मतदान करणे शक्य नव्हते. आपण संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांकडे मतपत्रिकेची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून पुढे काहीच प्रतिसाद आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बंदोबस्ताच्या नियोजनातून वेळ काढूनदेखील संबंधित यंत्रणेकडून योग्य मदत न मिळाल्याने मतदान करता आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
मतदान केले, मात्र आकडेवारी उपलब्ध नाही...
याबाबत मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांच्याकडे विचारणा केली असता, बऱ्याच पोलिसांनी मतदान केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यापर्यंत बॅलेट पेपरही पोहोचले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र सद्य:स्थितीत आकडेवारी उपलब्ध नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीतही मतपत्रिकेचा घोळ
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबई पोलीस दलातील बहुतांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बॅलेट पेपर न मिळाल्याने त्यांचे मतदान हुकले होते. मुंबई पोलीस दलातील अवघ्या ८,५४२ जणांनाच हा हक्क बजावता आला होता.