आमच्यावर दया करा
By admin | Published: September 15, 2015 02:40 AM2015-09-15T02:40:35+5:302015-09-15T02:40:35+5:30
मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात दया दाखवून कमी शिक्षा देण्याची मागणी केली़.
मुंबई : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींनी सोमवारी विशेष न्यायालयात दया दाखवून कमी शिक्षा देण्याची मागणी केली़.
विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर यातील दोषी आरोपींना हजर करण्यात आले़ त्या वेळी न्यायालयाने त्यांना या बॉम्बस्फोटासाठी दोषी धरल्याची माहिती दिली़ त्यानंतर शिक्षेबाबत प्रत्येक आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले़
आरोपी अहमद अन्सारी म्हणाला, मला दोन लहान मुले आहेत़ त्यामुळे कमी शिक्षा द्यावी, तर आरोपी डॉ. तन्वीर अन्सारी यांनी जनसेवा करायची असल्याने कमी शिक्षा द्यावी, असे म्हणणे मांडले. मी कष्टाने डॉक्टर झालो आहे़ मला जनसेवा करायची आहे़ तेव्हा मला कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी डॉ़ अन्सारीने केली़
आरोपी मोहम्मद शेखने त्याला मेंदूचा कर्करोग असल्याचे कारण देत कमी शिक्षा देण्याची विनंती केली़ आरोपी सिद्दिकीने आपण गरीब असल्याचे सांगत कमी शिक्षेची मागणी केली़ न्यायालयाच्या कामकामाची वेळ संपल्याने इतर आरोपींचे म्हणणे उद्या (मंगळवारी) न्यायालय नोंदवणार आहे़ वरील आरोपींस मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, मुझमिल शेख, सोहिल शेख, जमीर शेख, नावेद खान व असिफ खान यांना विशेष न्यायाधीश शिंदे यांनी ७/११ साखळी बॉम्बस्फोटासाठी दोषी धरले. तर अब्दुल शेख या आरोपीची पुराव्यांअभावी सुटका केली. उपनगरीय पश्चिम रेल्वे गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यात ११ जुलै २००६ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांत १८८ जणांचा बळी गेला होता; तर ८२९ जखमी झाले होते. (प्रतिनिधी)
खटल्याचा घटनाक्रम
अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले व याचा खटलाही सुरू झाला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने २००८मध्ये या खटल्याला स्थगिती दिली.
२०१०मध्ये ही स्थगिती न्यायालयाने उठवली. त्यानंतर विशेष न्यायाधीश यतिन शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू झाला.
या खटल्यात आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांचीही साक्ष नोंदवली. तसेच साडेपाच हजार पानांचा पुरावा न्यायालयात सादर झाला. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये याची सुनावणी पूर्ण झाली.