शेतीत नवनवीन प्रयोग करा
By admin | Published: December 8, 2014 12:54 AM2014-12-08T00:54:47+5:302014-12-08T00:54:47+5:30
शेतकऱ्यांना गहू, तांदूळ लावून पैसे मिळणार नाहीत. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतात नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे
नितीन गडकरी यांचे शेतकऱ्यांना आवाहन : अॅग्रोव्हिजनचा समारोप
नागपूर : शेतकऱ्यांना गहू, तांदूळ लावून पैसे मिळणार नाहीत. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतात नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केले.
सहाव्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते. अॅग्रोव्हिजन कुण्या व्यक्तीचे वा पक्षाचे नाही. हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासाचे काम करायचे आहे. शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढेल, यादृष्टीने नवीन तंत्रज्ञान त्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यामुळे गरिबी आणि बेरोजगारी दूर होऊन गाव समृद्ध होईल. परिणामी देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे गडकरी म्हणाले.
मंचावर प्रमुख अतिथी केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांच्यासह छत्तीसगडचे कृषिमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल, राज्यमंत्री राम शिंदे, आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिश महाराज आत्राम, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ना. चंद्रकांत पाटील, खासदार रामदास तडस, माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, माजी खासदार शिशुपाल पटले, संयोजक गिरीश गांधी, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ. सी.डी. मायी, संघटन सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, सुलेखा कुंभारे, विजय काशीकर, बाबासाहेब टिचकुले हजर होते.
गडकरी यांनी सांगितले की, कृषी विकासाची दृष्टी ठेवणारे हे प्रदर्शन आहे. यशस्वी प्रयोग केलेले तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी केवळ प्रदर्शन पाहून जाऊ नये, तर शेतकी प्रशिक्षण आणि प्रबोधनाचा मार्ग अवलंबवावा. प्रदर्शनाने शेतकऱ्यांचे जीवन सुधारणार आणि आत्महत्या थांबणार असेल तर हा प्रयोग यशस्वी आहे. पुढील वर्षी महिला बचत गट तसेच हॅण्डलूम व हॅण्डीक्राफ्ट या पूरक व्यवसायाला प्रदर्शनात जोडणार आहे. नागपुरातून फुलांची निर्यात व्हावी, उसासोबत बांबूची शेती करावी, संत्र्याचे मार्केटिंग करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
नागपूर जिल्हा सोलर सिटी
होणार - बावनकुळे
नागपूर जिल्हा सोलर सिटी म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सोलर ऊर्जेचा अवलंब केल्यास विजेचा तुटवडा जाणवणार नाही. जगातील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून काही नवे करण्याचा प्रयत्न राहील. या क्षेत्रात क्रांती करणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासाठी होईल.
शेतकऱ्यांना नवी दिशा
मिळाली -अग्रवाल
परंपरागत शेतीतून वर जात आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा. प्रदर्शनाने शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाल्याचे मत छत्तीसगडचे कृषिमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी येथे केले. शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा होणारी पिके घ्यावीत आणि रासायनिक खतांचा उपयोग टाळून जैविक शेतीकडे वळावे. सूक्ष्म सिंचनासाठी पाईपलाईन टाकावी, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. विजेवर पर्याय म्हणून सोलर ऊर्जेचा उपयोग करावा.
आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करा - शिंदे
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा, असे आवाहन ना. राम शिंदे यांनी केले. विचाराची देवाणघेवाण आणि उत्पादन वाढीसाठी प्रदर्शन महत्त्वाचे आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त होऊन त्यांची आर्थिक स्थिती उंचावणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार - आत्राम
अॅग्रोव्हिजनचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मत ना. अमरिश महाराज आत्राम यांनी व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, असा आपला प्रयत्न राहील. दरवर्षी त्यांना प्रदर्शनात आणू. सोलर पंप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल.
नवीन पद्धतीने पीक घ्या- पाटील
नवीन पद्धतीने पीक घेतल्यास शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल, असा विश्वास ना. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शेतीत प्रगती झाली तर कुणीही गावाबाहेर जाणार नाही. हे प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न आहे. गडकरी यांनी पूल आणि रस्ते बांधले, आता या प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी क्रांती केली आहे. प्रास्ताविक रवी बोरटकर यांनी तर रमेश मानकर यांनी आभार मानले. प्रायोजकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कोळशापासून ऊर्जेऐवजी खतनिर्मिती व्हावी
शेतकऱ्यांना कमी किमतीत खत उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. खत उत्पादनासाठी कोळसा लागेल. कोळशाचे ब्लॉक उपलब्ध व्हावेत. कोळशापासून ऊर्जेऐवजी खतनिर्मिती व्हावी, असे मत केंद्रीय रसायन आणि खते मंत्री हंसराज अहीर यांनी येथे व्यक्त केले. शेती आणि जनावरे यांचे नाते आहे. वनभूमीवर उगवणाऱ्या गवताची बँक (चारा बँक) उभी करण्याचा प्रयत्न आहे. आयोजनाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत होईल. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे, अशांसाठी हा प्रयोग यशस्वी ठरेल. तेलबिया आणि डाळीचे उत्पादन वाढले पाहिजे. सिंचनाअभावी उत्पादकता वाढत नाही, ही शोकांतिका आहे. खतावर १.२ लाख कोटी रुपयांची सबसिडी दिली जाते. ती कंपन्यांना मिळते. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन आणि सेंद्रीय शेतीकडे वळविण्याची गरज आहे. सोलर ऊर्जेसाठी केंद्रातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. हे प्रदर्शन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करेल, असा विश्वास अहीर यांनी व्यक्त केला.