मतदान करायचं बर कां! की इंग्लिशमध्ये सांगू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 01:16 PM2017-01-18T13:16:05+5:302017-01-18T13:21:50+5:30
सैराटफेम आर्ची अन परश्या म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - 'मराठीत सांगितलेलं समजतं ना की इंग्लिशमध्ये सांगू?' सैराटमधला हा फेमस डायलॉग घेऊन आर्ची-परशा पुन्हा तुमच्या भेटीला येणारेत..! अहो, एवढे उत्साहित होऊ नका, आर्ची-परशाचा नवा पिक्चर येत नाहीये हे खरं, पण ते पुन्हा तुम्हाला भेटायला येणारेत ते मतदानाचे महत्व पटवण्यासाठी... आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परश्या, म्हणजेच सगळ्यांचा लाडका आकाश ठोसर हे दोघेही निवडणूक आयोगाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने ही अनोखी शक्कल लढवली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करा, असं आवाहन आर्ची-परश्या मतदारांना करणार आहेत.
महाराष्ट्रातील तरुणवर्ग मतदार नोंदणी आणि मतदान प्रक्रियेत मागे पडत आहे. तीन टक्के तरुणाईपैकी फक्त 1.1 टक्के मतदार या प्रक्रियेत सहभागी होतात. राज्यात ८.३४ कोटी मतदार असून त्यापैकी १२.१६ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी आणि भावी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही शक्कल लढवली असून रिंकू आणि आकाश निवडणूक आयोगाच्या बॅनरवरही झळकले आहेत. त्या दोघांनाही ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनीही आनंदाने परवानगी दिली, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी दिली.