काकांना पुतण्याची इतकी भीती कधीपासून वाटतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:31 AM2018-06-26T05:31:00+5:302018-06-26T05:31:03+5:30
काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय
मुंबई : काका राज ठाकरे यांना पुतण्या आदित्यची इतकी भीती कधीपासून वाटू लागली, एखादा युवक राज्याच्या हितासाठी चांगले काम करतोय तर कौतुक करायचे सोडून राजकीय टीका कसली करताय, अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. प्लॅस्टिकबंदीविरोधात मनसेने थेट मातोश्रीबाहेर बॅनरबाजी केल्यामुळे रामदास कदम यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, प्लॅस्टिकबंदीचा निर्णय गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये घेतला गेला होता. लोकांना वेळ मिळावा यासाठी सहा महिन्यांचा त्यांना अवधी दिला होता. शिवाय, उच्च न्यायालयानेही आणखी तीन महिने मुदत वाढवून दिली होती. या कालावधीत राज्यभर विविध माध्यमातून प्लॅस्टिकबंदीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. गावखेड्यातील बस स्टँडवरही सरकारने जाहिराती दिल्या. एखाद्या राजकीय नेत्याला, पक्षाला याची माहिती नसेल तर ते त्यांचे अपयश आहे, असेही कदम यांनी सांगितले.
राज्यभरातून प्लॅस्टिकबंदीचे स्वागत होत आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांनाच काही सवयी बदलाव्या लागतील. राज ठाकरे कधी बाजारात जात नाहीत त्यामुळे त्यांना यातले काही दिसत नाही. प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूंचे १२० स्टॉल वरळीत लागले आहेत, अशा शब्दात रामदास कदम यांनी मनसे आणि राज यांचा समाचार घेतला.
दंडाच्या रकमेबाबत बोलताना ्नरामदास कदम म्हणाले की, नाईलाजाने मोठ्या रकमेच्या दंडाची तरतूद करावी लागली. इतके दिवस बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापरासाठी केवळ २००-३०० इतका दंड होता. त्यामुळे कुणाला कायद्याचा धाकच नव्हता. बंदीची प्रभावी अंमलबजावणीच राज्यात झाली नाही. यावर अन्य राज्यांचा अभ्यास करूनच पाच हजार ते २५ हजार इतक्या दंडाची तरतूद करण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
नॉन ओव्हन पिशव्यांवरही बंदी
कापडी पिशवीच्या नावाखाली सध्या बाजारात नॉन ओव्हन पिशव्या आणल्या जात आहेत. या पिशव्यांवरही बंदी आहे. त्यामुळे कारखानदारांनी ताबडतोब त्यांचे उत्पादन थांबवावे. उद्यापासून अशा कारखानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
रोजगार बुडल्याचा आरोप चुकीचा
नऊ महिन्यांपासून प्लॅस्टिकबंदीचा विषय सुरू आहे. शिवाय, राज्यातील एकूण प्लॅस्टिकपैकी फक्त २० टक्के प्लॅस्टिकची महाराष्ट्रात निर्मिती होते. उर्वरित प्लॅस्टिक गुजरातमधून महाराष्ट्रात येते. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगार बुडाल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे कदम म्हणाले.