वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण...; अमृता फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:46 AM2019-12-29T10:46:28+5:302019-12-29T10:47:19+5:30
परवाच मुख्यमंत्री बंगल्यावरील एका बेडरूममध्ये उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर लिहिलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये युटी वाईट आहेत, असे लहान मुलाच्या अक्षरात लिहिण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्रात युती तुटल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले आहे. याचे शल्य त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सतावत असून त्या मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. काल रात्री त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून निशाना साधला आहे.
परवाच मुख्यमंत्री बंगल्यावरील एका बेडरूममध्ये उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर लिहिलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस रॉक्स असं लिहीण्यात आलं आहे. तसेच हू इज यू टी म्हणजे यु टी कोण आहेत...? यू टी इज मीन म्हणजे यू टी वाईट आहेत. 'यूटी' म्हणजे नेमकं कोण?; यावरून आता तर्कवितर्क लावले जात असले तरी उद्धव ठाकरे यांच्या नावाचं इंग्रजीतील संक्षिप्त रूप 'यूटी' असं होतं. त्यामुळं हे त्यांनाच उद्देशून असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमकं कोणी लिहिलं आहे, व्हिडिओ कोणी चित्रण केला आहे, याबाबत मात्र कोणतीही सध्या माहिती समोर आलेली नाही.
तर हा उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर फडणवीसांची मुलगी दिविजाने लिहिल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, मी बंगला सोडताना कोपरा कोपरा पाहिलेला आहे. यामुळे तिने असे केलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. तिथे स्टाफही राहतो. त्यांच्या खेळणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी केले असेल.
तर अमृता फडणवीस यांनी यावर खुलासा करताना आम्ही महिन्य़ापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेले होते. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेले नाही, असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका वृत्तसंस्थेच्या ट्विटला रिट्विट करत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही, पण अशा नेत्यासोबत राहणे ही चूक आहे, असे म्हणत 'जागो महाराष्ट्र' अशी टिप्पणी केली आहे.