शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी हावरे
By admin | Published: July 23, 2016 04:15 AM2016-07-23T04:15:49+5:302016-07-23T04:15:49+5:30
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यदु जोशी,
मुंबई- शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी नवी मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि भाजपाचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
हावरे हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्याआधी ते भाजपाचे ठाणे विभागीय अध्यक्ष होते. २००९ मध्ये त्यांनी तत्कालिन मंत्री गणेश नाईक यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली होती. ते मूळचे अमरावतीकर असले तरी नवी मुंबई, ठाणे परिसरात त्यांनी मोठे बांधकाम विश्व उभारले आहे. त्यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून पदवी संपादन केली असून न्युक्लिअर इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. परवडणारी घरे या विषयावर ते सध्या मुंबई विद्यापीठात पीएचडी करीत आहेत.
आघाडी सरकारच्या काळात श्रीरामपूरचे तत्कालीन काँग्रेस आमदार जयंत ससाणे हे संस्थानचे अध्यक्ष होते. आधी धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणात असलेले हे संस्थान २००४ पासून राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आले. तेव्हापासून मुख्यमंत्री हे अध्यक्ष व विश्वस्तांची नेमणूक करू लागले. २००४ ते २०१२ या काळात ससाणे हेच अध्यक्ष होते.
न्यायालयीन याचिकेनंतर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर लगेच तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ससाणे यांना पुन्हा अध्यक्षपदी नेमले. न्यायालयाने नंतर पुन्हा विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश दिले. तेव्हापासून तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळ संस्थानचा कारभार करते. त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायधीश आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
आता हावरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.