एव्हरशाइन सिटीत मोकाट गुरांचा सुळसुळाट
By admin | Published: July 21, 2016 03:37 AM2016-07-21T03:37:20+5:302016-07-21T03:37:20+5:30
वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत मोकाट गुरांचा मुक्त संचार व सुळसुळाट झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.
वसई : वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत मोकाट गुरांचा मुक्त संचार व सुळसुळाट झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोकाट गुरांवर प्रतिबंध घालण्याबाबत कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नागरीकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मोकाट जनावरे कळपा-कळपाने रस्त्यावर बसत असल्याने नागरिक, विद्यार्थी व वाहनचालकांना वाहतुकीस मोठया प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मोकाट गुरांना कोंडवाडयात पाठवावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
एव्हरशाईनसिटीत जीएसके, विद्याविकासिनी, होली फॅमीली, सेठ विद्यामंदिर, सेठ विद्यामंदिर अशा चार मोठ्या शाळा व कॉलेज आहेत. यातील सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी सात वाजता भरतात. याच वेळी एव्हरशाईनसिटी लास्टस्टॉप येथे असलेल्या आदर्शनगर डोंगरीतील तबेल्यांमधून गाई व म्हशी चरण्यासाठी सोडल्या जातात. तबेल्यातून निघालेल्या गाई, म्हशी त्यानंतर परिसरात अक्षरश धुमाकूळ घालतात. अनेकदा ही जनावरे सैरावैरा पळतांना विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने विद्यार्थ्यांची पळापळ होते. तसेच एव्हरशाईनसिटीतील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी मोकाट गुरांनी कळपा-कळपाने ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडी होत असते. रस्त्याच्या मधोमध बसलेल्या या गुरांना हकल्यास ती अंगावर धावून येतात. त्यामुळे वाहनचालक किंवा नागरिकही त्यांना हटवण्याची हिम्मत करत नाही. गुरे तासान् तास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात. त्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकारही येथे घडतात, असे काही चालकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>व्यापाऱ्यांनाही फटका, तबेलेवाल्यांना आवरा
एव्हरशाईनसिटी मुख्य रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. या दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू, धान्य देखील ही गुरें खात असल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. मोकाट गुराढोरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासनाकडून मात्र कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेने आदर्शनगर डोंगरीत असलेल्या अवैध तबेल्यांवर कारवाई केल्यास किंंवा तबेला मालकांना जनावर रस्त्यावर सोडण्यास मनाई करण्याची ताकीद दिल्यास मोकाट गुरांच्या सुळसुळाटाला प्रतिबंध बसणे शक्य आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरीकांना व विद्यार्थ्यांना मात्र दैनंदिन मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे.